|Thursday, September 19, 2019
You are here: Home » क्रिडा » स्टोक्सला फलंदाजीचा सूर मिळाला

स्टोक्सला फलंदाजीचा सूर मिळाला 

वृत्तसंस्था /वेलिंग्टन :

इंग्लंडचा 26 वर्षीय फलंदाज बेन स्टोक्स गेल्या काही दिवसापासून फलंदाजीचा सूर मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. न्यूझीलंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय टी-20 सामन्यात स्टोक्सला अखेर फलंदाजीचा सूर मिळाला.

कँटरबेरी आणि ओटॅगो यांच्यातील टी-20 सामन्यात गुरूवारी खेळताना कँटरबेरीच्या स्टोक्सने 7 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 47 चेंडूत 93 धावा झोडपल्या. स्टोक्सने अलिकडेच कमी कालावधीसाठी कँटरबेरीशी खेळण्याचा करार केला आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये ब्रिस्टॉलच्या नाईट क्लबमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातल्याबद्दल पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट मंडळाने त्याला ऍशेस मालिकेच्या संघातून वगळून त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

इंग्लंडचा अष्टपैलू स्टोक्स याचा जन्म न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे झाला. गुरूवारच्या सामन्यात स्टोक्सच्या कँटरबेरी संघाने 20 षटकांत 9 बाद 217 धावा जमविल्या. तसेच त्याने 17 धावांत 1 गडी बाद केला. कँटरबेरीने हा सामना 134 धावांनी जिंकला. कँटरबेरीचा फिरकी गोलंदाज टॉड ऍसलने 18 धावांत 3 गडी बाद केले.