|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » उद्योग » मारुती सुझुकीची 10 हजारावर गरुडभरारी

मारुती सुझुकीची 10 हजारावर गरुडभरारी 

बीएसईचा सेन्सेक्स 59, एनएसईचा निफ्टी 19 अंशाने घसरला

वृत्तसंस्था / मुंबई

बुधवारी बाजारात पहिल्यांदा तेजी आल्यानंतर काही मर्यादित प्रमाणात व्यवहार होत होते. सत्राच्या प्रारंभी निफ्टीने नवीन उच्चांक गाठल्यावर बाजार बंद होताना मात्र घसरला. निफ्टीने 10,494 आणि सेन्सेक्सने 33,956 या नवीन उच्चांकाला गवसणी घातली होती. मारुती सुझुकीच्या समभागाने पहिल्यांदाच 10 हजाराचा टप्पा गाठला. कंपनीचे बाजारमूल्य 3 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

बीएसईचा सेन्सेक्स 59 अंशाने घसरत 33,777 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 19 अंशाच्या कमजोरीने 10,444 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात मात्र चांगली खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.5 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वधारत बंद झाला.

बँकिंग, वाहन, औषध, तेल आणि वायू समभागात विक्री झाल्याने दबाव आला होता. बँक निफ्टी 0.5 टक्क्यांनी घसरत 25,592 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 1.2 टक्के, वाहन निर्देशांक 0.3 टक्के आणि औषध निर्देशांक 0.2 टक्क्यांनी घसरला. मीडिया, आयटी, धातू, रियल्टी, भांडवली वस्तू समभागात चांगली खरेदी झाली.

दिग्गज समभागांची कामगिरी

टाटा मोटर्स डीव्हीआर, हिंडाल्को, ओएनजीसी, विप्रो, हीरो मोटो, इन्फोसिस, एल ऍण्ड टी 2.8-1.1 टक्क्यांनी वधारले. आयशर मोटर्स, डॉ. रेड्डीज लॅब, भारती एअरटेल, अंबुजा सिमेंट, एचपीसीएल, टाटा स्टील, एचडीएफसी, एचडीएफसी बँक 2.1-0.9 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅपमध्ये रिलायन्स कॅपिटल, सीजी कंझ्युमर, रिलायन्स इन्फ्रा, नाल्को 7.2-3.5 टक्क्यांनी वधारले. बँक ऑफ इंडिया, ब्लू डार्ट, पेज इन्डस्ट्रीज, अल्केम लॅब, राजेश एक्स्पोर्ट्स 4-2 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात मोरपीन लॅब, एमटीएनएल, शांती गियर्स, अलेकॉन इंजिनियरिंग, रॅमको सिमेंट 20-14.3 टक्क्यांनी मजबूत झाले. इंडो रामा सिंथेटिक, ल्यूमॅक्स ऑटो टेक, एचईजी, डीआयसी इंडिया 6.5-3.3 टक्क्यांनी घसरले.

Related posts: