|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अरविंद केजरीवाल यांच्यावर विरोधकांचा गंभीर आरोप

अरविंद केजरीवाल यांच्यावर विरोधकांचा गंभीर आरोप 

नवी दिल्ली

 जिवंत अर्भकाला मृत ठरविण्याप्रकरणी मॅक्स रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याच्या घटनेने राजकीय वळण घेतले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाच लक्ष्य केले. केजरीवाल सरकारने प्रामाणिकपणा विकल्याचा आरोप करत याप्रकरणी किती रुपयांमध्ये व्यवहार झाल्याची विचारणा तिवारींनी केजरीवालांना केली. दिल्लीच्या शालीमार बाग येथील मॅक्स रुग्णालयाचा परवाना रद्द झाल्याच्या काही दिवसातच बुधवारी रुग्णालयाने पुन्हा कामकाज सुरू केले. वित्त आयुक्त न्यायालयाद्वारे दिल्ली सरकारच्या आदेशावर स्थगिती देण्यात आल्यानंतर कामकाज सुरू केल्याचा दावा रुग्णालयाने केला. यानंतर केजरीवालांचे माजी सहकारी कपिल मिश्रा आणि भाजपने आम आदमी पक्षाच्या सरकारवर हल्ला चढविला. जी शंका होती तेच घडले, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, केजरीवाल सरकारचे वर्तनच असे आहे. रुग्णालयासोबत अरविंद केजरीवालांचा कितीचा व्यवहार झाला? याला म्हणतात ईमानदारी विकणे असे तिवारी यांनी ट्विटमध्ये नमूद केले.

मॅक्स रुग्णालयाच्या प्रकरणात जाणूनबुजून चुकीचा आदेश लिहिण्यात आला, यामुळे आदेशाला स्थगिती मिळणे क्रमप्राप्तच होते असा आरोप मिश्रा यांनी केला. दिल्ली सरकारने 8 डिसेंबर रोजी 250 खाटांच्या मॅक्स रुग्णालयाचा परवाना रद्द केला होता. परंतु आदेशातील चुकांमुळे त्याला आयुक्तांनी स्थगिती दिली आहे.