|Sunday, September 22, 2019
You are here: Home » क्रिडा » विदर्भ प्रथमच रणजी फायनलच्या उंबरठय़ावर

विदर्भ प्रथमच रणजी फायनलच्या उंबरठय़ावर 

कर्नाटकविरुद्ध पराभवाचे अस्मानी संकट, 198 धावांचे आव्हान असताना दिवसअखेर 7 बाद 111 अशी पडझड

कोलकाता/ वृत्तसंस्था

रजनीश गुरबानीच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर विदर्भने रणजी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठण्याच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले. कर्नाटकला दुसऱया डावात विजयासाठी 198 धावांचे आव्हान असताना बुधवारी चौथ्या दिवसअखेर त्यांची 7 बाद 111 अशी दाणादाण उडाली असून कर्णधार विनयकुमार 19 तर श्रेयस गोपाल एका धावेवर खेळत होते. विदर्भतर्फे गुरबानीने 35 धावात 4 बळी घेतले.

विदर्भने बुधवारी 4 बाद 195 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर आदित्य सरवटेचे झुंजार अर्धशतक ठळक वैशिष्टय़ ठरले. आश्चर्याची बाब म्हणजे आदित्य गोलंदाज म्हणून संघात आहे. त्याने येथे 55 धावांचे योगदान दिले व त्या बळावरच विदर्भला सर्वबाद 313 धावांपर्यंत मजल मारता आली.

मंगळवारी 71 धावांवर नाबाद राहिलेला गणेश सतीश कालच्या धावसंख्येत केवळ 10 धावांची भर घालू शकला. आर. विनयकुमार व अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी 3 व श्रीनाथ अरविंदने 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात विजयासाठी 198 धावांचे आव्हान असताना कर्नाटकची सुरुवात अगदीच खराब झाली. मायंक अगरवाल केवळ 3 धावांवर बाद झाला तर रविकुमार समर्थ (24) व देगा निश्चल (7) हे देखील लागोपाठ तंबूत परतले. करुण नायर (41 चेंडूत 30) गुरबानीच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देत बाद झाल्यानंतर कर्नाटकला आणखी एक जबरदस्त धक्का बसला.

सीएम गौतम देखील गुरबानीचेच सावज ठरला. कर्नाटकाचा संघ एकवेळ 5 वर्षात तिसऱयांदा रणजी अंतिम लढतीत धडक मारण्यासाठी महत्त्वाकांक्षी होता. पण, प्रत्यक्षात त्यांची येथे चांगलीच दाणादाण उडाली. विदर्भतर्फे गुरबानी व सिद्धेश नेरळ यांनी अतिशय भेदक व उसळता मारा करत कर्नाटकच्या फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडवली. चहापानावेळी कर्नाटकची स्थिती 3 बाद 69 होती व नायर व गौतम खेळपट्टीवर होते. या उभयतांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, नंतर नायर 30 धावांवर बाद झाला. ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिल्याने कर्नाटकचा संघ विशेषतः गुरबानीसमोर बराच हतबल असल्याचे दिसून आले.