|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पर्यटन प्रकल्प मोजणी ग्रामस्थांनी रोखली

पर्यटन प्रकल्प मोजणी ग्रामस्थांनी रोखली 

तोंडवळी ग्रामस्थांचा तीव्र विरोध : शासनाने विश्वासात न घेतल्याचा आरोप

वार्ताहर / आचरा:

  तोंडवळी येथे गुरुवारी सुरू करण्यात आलेल्या पर्यटन प्रकल्पाची जमीन मोजणी स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध करीत रोखली. या प्रकल्पासाठी यापूर्वी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता. मात्र, काही काळाने विरोध मावळला होता. त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, आज पुन्हा एकदा ग्रामस्थांनी आपला प्रकल्पासाठी असलेला विरोध ताकदीनिशी व्यक्त करीत अधिकाऱयांना माघारी पाठविले. त्यामुळे तोंडवळी येथील सी वर्ल्ड प्रकल्पानंतर पर्यटन प्रकल्पालाही ग्रामस्थांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  पेंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत तोंडवळी-तळाशिल किनाऱयावर पर्यटन सुविधा उभारण्याच्या प्रकल्पाला सात कोटी रुपये मंजूर झाले आहेत. प्रकल्प राबविण्यासाठी या जमिनीची मोजणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भूमी अभिलेखमार्फत मोजणी आणली होती. तोंडवळी-तळाशिल किनाऱयावरील सरकारी मालकीच्या सर्व्हे नं. 77 मधील सुमारे 19 हेक्टर जमिनीच्या मोजणीचे काम 13 डिसेंबरपासून सुरू केले होते मात्र सीमा निश्चितीच्या कामाची सुरुवात गुरुवारी सकाळपासून सुरू होणार होती. या जागेत स्थानिक मच्छीमारांच्या होडय़ा, जाळी ठेवण्यासाठीच्या झोपडय़ा पूर्वीपासूनच असल्याने कोणतीही कल्पना न देता होणाऱया मोजणीला तोंडवळी-तळाशिल ग्रामस्थांनी विरोध करण्याचे ठरविले. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास मोजणी अधिकारी दाखल होताच तोंडवळीचे नवनिर्वाचित सरपंच आबा कांदळकर, उपसरपंच संजय केळुसकर, माजी सरपंच जयहरी कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली रवी पाटील, भाऊ जोशी, बाबा तांडेल, प्रतीक्षा पाटील, गजानन तारी, आप्पा हडकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी या मोजणी अधिकाऱयांना घेराव घालत प्रश्नांचा भडीमार करीत मोजणी बंद पाडली. यावेळी भूमी अभिलेखचे अय्याज शेख व ग्रामस्थांत शाब्दिक चकमक उडाली. यावेळी वातावरण काहीसे तणावाचे झाले होते.

कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक

  आम्ही ग्रामस्थ मंदिरात चर्चेसाठी जमलेले असताना आपण चर्चेसाठी येतो, असे सांगून का आला नाहीत? असा सवाल करीत भूमी अभिलेखचे अय्याज शेख, पर्यटन महामंडळाचे पृथ्वीराज जाधव यांना धारेवर धरले. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थ व अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भूमी अभिलेखचे शेख म्हणाले, हे सरकारी काम आहे. 77 सर्व्हे नंबर हा सरकारी आहे. आमचे हद्द दाखविण्याचे काम आहे. आम्ही ते करणार. तुम्ही तुमच्या हरकती लेखी द्या. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक होऊन आम्ही या अगोदरच ग्रामसभेच्या ठरावाने विरोध दर्शवून शासनाला कळविले आहे. आम्ही जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने काम करीत आहोत. तुम्ही सरकारी कामात अडथळा आणू नका, असे मोजणी अधिकारी शेख यांनी म्हणताच ग्रामस्थांनी आक्रमक होत आम्हाला अटक झाली तरी चालेल पण मोजणी करू देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने शेख यांना काढता पाय घ्यावा लागला.

बळजबरीने सुरू केली मोजणी!

  तळाशिल ग्रामस्थ मंदिरात सकाळी 9 पासून जमले होते. मात्र, भूमी अभिलेख व पर्यटन महामंडळाचे अधिकारी दुपारी 3 पर्यंत फिरकलेच नाहीत. ग्रामस्थांना विश्वासात न घेता, परस्पर मोजणीला सुरुवात केली होती. या मोजणीच्या नोटिसा सर्व्हे नंबर 77 च्या लगतच्या कुळाच्या नोटिसाही बजावल्या गेल्या नसल्याचे ग्रामस्थांनी सांगत बळजबरीने मोजणी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला.

पर्यटन महामंडळाच्या ताब्यात जागा देणार नाही!

 भाजप मच्छीमार सेलचे रविकिरण तोरसकर यांनी मोजणीत सहभागी कर्मचाऱयांना धारेवर धरत ग्रामस्थांशी संवाद न साधता मोजणी कशासाठी करता? असा सवाल करीत मच्छीमारांना पर्यटन महामंडळाला जागाच द्यायची नाही. पर्यटन महामंडळ हे फक्त स्वत:चा विकास करते. आमची मागणी आहे, की सरकारी जागा ही मच्छीमारांच्या ताब्यात द्या. आम्ही पर्यटनातून विकास साधू, असे सुनावले. बळजबरी थांबवा अन्यथा मच्छीमारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.