|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » लालूपुत्रांच्या बंदने घेतला महिलेचा जीव

लालूपुत्रांच्या बंदने घेतला महिलेचा जीव 

पाटणा / वृत्तसंस्था :

बिहारमधील खनन विषयक धोरणाच्या विरोधात राष्ट्रीय जनता दलाकडून गुरुवारी बिहार बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील वाहतूक रोखून धरत ठिकठिकाणी जाळपोळ केली. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजप्रताप तसेच तेजस्वी देखील रस्त्यांवर उतरले, तर वैशाली येथे वाहतूक रोखून धरणाऱया राजद कार्यकर्त्यांनी एका रुग्णवाहिकेला पाटणा येथे जाण्यापासून रोखल्याने एका रुग्ण महिलेचा मृत्यू झाला.

राजद कार्यकर्त्यांनी हाजीपूरला पाटणा शहराशी जोडणाऱया गांधी सेतूवरून कोणतेही वाहन पुढे जाऊ दिले जाऊ दिले नाही. गोपालगंज साखर कारखान्याच्या दुर्घटनेतील जखमींना नेणारी रुग्णवाहिका पूलावरील वाहतूक कोंडीत अडकून पडली. यामुळे जखमींना कित्येक तास उपचाराविना तडफडावे लागले.

रेल्वे रोखल्या, रुळांवर जाळपोळ

शेखपुरा येथे गया-किउल पॅसेंजर रेल्वेला राजद कार्यकर्त्यांनी स्थानकावर रोखले. तर पाटणा-रांची जनशताब्दी एक्स्प्रेसला जहानाबाद येथे कार्यकर्त्यांनी रोखून धरले, तसेच तेथे रूळांवर जाळपोळ करण्यात आली. आरा-सासाराम राज्य महामार्गावरील वाहतूक बळजबरीने थांबविण्यात आली. 

अवैध खननावर स्थगिती

बिहारमध्ये गंगा आणि इतर नद्यांमधून वाळूचा अवैध उपसा करण्यात येत होता. नितीश कुमार यांच्या सरकारने यावर बंदी घातली आहे. या बंदीला राजदकडून विरोध होतोय. या विरोधांतर्गत राजदने राज्यात बंदचे आवाहन केले होते. सरकारचे वाळू धोरण स्पष्ट नसल्याचे आमचा विरोध कायम राहील असे वक्तव्य राजदचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पूर्वे यांनी केले.

शीख भाविकांना रोखणार नाही

पाटणा येथे सध्या प्रकाशपर्वाची तयारी केली जात असून यासाठी शीख भाविक पाटणा येथे दाखल होऊ लागले आहेत. शीख भाविकांना बंदमधून दिलासा देण्यात येईल असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. पाटणा शहर आणि हमरस्ता बंदमधून वगळले जाईल. शीख भाविकांची वाहने रोखली जाणार नाहीत असे त्यांनी सांगितले.

Related posts: