|Friday, February 28, 2020
You are here: Home » क्रिडा » सनसनाटी विजयासह विदर्भ प्रथमच अंतिम फेरीत!

सनसनाटी विजयासह विदर्भ प्रथमच अंतिम फेरीत! 

वृत्तसंस्था /कोलकाता :

सामनावीर रजनीश गुरबानीने 23.1 षटकात 68 धावांमध्येच 7 बळी घेतल्यानंतर विदर्भने कर्नाटकविरुद्ध अवघ्या 5 धावांनी निसटता विजय संपादन केला आणि रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. गुरुवारी गुरबानीने कर्नाटकाचा शेवटचा फलंदाज बाद केल्यानंतर विदर्भच्या खेळाडूंच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले. दुसऱया डावात 198 धावांचे आव्हान असणाऱया कर्नाटकचा डाव येथे 192 धावांमध्ये संपुष्टात आला.

ईडन गार्डन्सवरील रंगतदार उपांत्य लढतीत दोन्ही संघांनी शेवटच्या दिवशी देखील अनेक चढउतार अनुभवले आणि अंतिमतः येथे विदर्भची बाजी झाली. कर्नाटकने गुरुवारी शेवटचे 3 गडी बाकी असताना उर्वरित 87 धावांचा पाठलाग सुरु केला. आर. विनयकुमार 8 व्या गडय़ाच्या रुपात बाद झाला. त्यानंतर संयमी श्रेयस गोपाल (57 चेंडूत नाबाद 24) व आक्रमक फलंदाजी साकारणारा अभिमन्यू मिथुन (26 चेंडूत 5 चौकारांसह 33) यांनी नवव्या गडय़ासाठी 48 धावांच भागीदारी साकारत संघाला अवघ्या 5 धावांच्या उंबरठय़ावर आणले.

कर्नाटकचा संघ या उभयतांच्या संयमी, आक्रमक फलंदाजीच्या बळावर संघर्षमय विजय खेचून आणेल, असेही संकेत होते. पण, याचवेळी जलदगती स्टार गोलंदाज रजनीश गुरबानीने मिथुनला वाईड थर्डमॅनवरील आदित्य सरवटेकरवी झेलबाद केले व या सामन्याला अचानक कलाटणी मिळाली. शेवटचा फलंदाज एस. अरविंद केवळ 6 चेंडूपुरता मैदानात टिकू शकला. गुरबानीने डावातील सातव्या व सामन्यातील 12 व्या बळीच्या रुपाने त्याला बाद केल्यानंतर विदर्भच्या स्वप्नवत विजयावर शिक्कामोर्तब झाले.

विदर्भच्या विजयानंतर त्यांचे ड्रेसिंगरुममधील खेळाडू मैदानात उतरलेच. शिवाय, संघ प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनीही आपल्या आनंदाला वाट करुन दिली. ‘ईडन गार्डन्ससारख्या ऐतिहासिक महत्त्वाच्या मैदानावर आमच्या संघाने नवा इतिहास रचला’, असे ते याप्रसंगी म्हणाले.

Related posts: