|Thursday, September 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मानवाची गरज आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म

मानवाची गरज आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म 

नाताळ म्हटले की लगेचच आपणाला घरावरील लखलखणारे तारे (स्टार), ख्रिसमस ट्री, चर्चमधील येशूच्या जन्मी नाटिका, चर्चमधील प्रार्थना, सुंदरसे कार्यक्रम व सर्व लहान मुलांना खाऊ वाटणारा, सर्वांचे लक्ष वेधणारा सांताक्लॉज व सुंदरसा केक अशा अनेक सुंदरशा गोष्टी प्रत्येकास पहावयास व अनुभवयास मिळतात. परंतु मनुष्य जातीमध्ये सर्वात मोठा गैरसमज देखील तितकाच आहे की, हा सण ब्रिटिशांचा सण किंवा बाहेर देशातील सण आहे. परंतु कधी तुम्ही नाताळ म्हणजे काय? किंवा हे लोक भारतात म्हणजे आपल्या देशामध्ये साजरा का करतात याचा विचार किंवा या गोष्टींचा कधी शोध घेतला आहे का? शोध घेतला नसेल तर आज नाताळनिमित्त सत्य तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

आपल्या भारत देशापासून अवघ्या 5 तास 13 मिनिटांच्या अंतरावर विमान प्रवासानुसार ईज्राईल हे राष्ट्र आहे. म्हणजेच हे आपल्या आशिया खंडातच मोडले जाते. सांगायचे तात्पर्य हेच आहे की, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आशिया खंडातील (बेथेलेहम) या गावी झाला. या कारणांमुळे ईज्राईल राष्ट्राचा व आपल्या भारत देशाचा पूर्वीपासून जवळचा संबंध असावा. त्यामुळे आपल्याला पवित्र शास्त्र बायबलमधील ऐस्तर नावाच्या पुस्तकामध्ये हिंदुस्थान हा शब्द त्या काळामध्ये लिहिलेला आढळतो. म्हणूनच पहिल्या शतकाच्या आधीपासून येशू ख्रिस्ताची शिकवण आत्मसात करणारे लोक भारतामध्ये असावेत असे इतिहासकारांचे मत आहे. त्यानंतर आपल्याला हे पहावयास मिळते की प्रभू येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य ज्याचे नाव थोमा होते, हा भारत देशामध्ये म्हणजेच चेन्नईमध्ये आला असे आपणास पहावयास मिळते. आश्चर्यांची बाब ही आहे की, भारतामध्ये येशू प्रभूंची शिकवण ही पहिल्या शतकाच्या आधीपासून होती, असे आपण इतिहासामध्ये वाचतो. परंतु हीच प्रभू येशूची शिकवण अमेरिकेमध्ये साधारण नऊशे वर्षानंतर पोहचली. म्हणजे प्रभू येशूची शिकवण ही परदेशातून नव्हे तर भारतानंतर परदेशात पोहचली हे तितकेच सत्य आहे. या सणाला परदेशीयांचा सण किंवा या सणाबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेणे हे निश्चितच चुकीचे ठरेल.

कारण पवित्र शास्त्र बायबल आपणा सर्व मानवजातीस असे शिकविते की, पहिल्या शतकामध्ये जे प्रेषित किंवा शिष्य हे प्रभू येशूची शिकवण आचरणात आणत होते, त्यांनाच फक्त ख्रिस्ती म्हणून संबोधले गेले आहे. ख्रिस्ती या शब्दाचा अर्थ होतो विश्वासणारा. त्यामुळे दुसरी महत्त्वाची बाब लक्षपूर्वक अभ्यास केल्यास लक्षात येते की, ख्रिस्ती हा धर्म नसून, जीवन जगण्याचा मार्ग आहे. प्रभू येशू हे मुळी धर्म स्थापनेसाठी नव्हे तर मानवजातीचे जीवन बदलण्यास आले. हीच प्रभू येशूची शिकवण आहे. जो कोणी त्यांची शिकवण आत्मसात करतो व त्या शिक्षणाप्रमाणे चालतो, वागतो त्यालाच ख्रिस्ताचे अनुयायी म्हणजेच ख्रिस्ती असे संबोधले जाते.

 संपूर्ण मानवजातीमध्ये ईश्वराचा झटून शोध घेणारा कुणीच नव्हता असे पवित्र शास्त्र बायबल आपणाला शिकविते. कारण पापाचे वेतन मरण आहे. मग तुम्ही म्हणाल पाप म्हणजे काय? पाप म्हणजे चांगले करणे ज्याला कळत असूनही जो त्याप्रमाणे करत नाही त्याला ते पाप आहे.

पवित्र शास्त्र ‘बायबल’ आपणाला शिकविते की पापामुळे आपण आज माणसे स्वार्थी,  धनलोभी, बढाईखोर, गर्वि÷, निंदक, आई बाबास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाहय़ रूप दाखवून तिचे समर्थन नाकारणारी अशी झाली आहे. अशा या भयंकर नरकात घेऊन जाणाऱया पापापासून सुटका मिळण्यासाठी या संपूर्ण मानव जातीसाठी फक्त एकच आणि एकमेव मार्ग आहे तो म्हणजे प्रभू येशू. कारण ‘देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.’

आज जो कोण त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवतो त्यालाच सार्वकालिक जीवन प्राप्त होईल हे तितकेच सत्य आहे. म्हणून प्रभू येशूचा जन्म पृथ्वीतलावर झाला, तेव्हा दिव्यदुतांनी मेंढपाळांना ही आनंदाची सुवार्ता सांगितली की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्माला आहे. तो ख्रिस्त स्वर्ग सोडून या जगामध्ये आला. संपूर्ण मानव जातीच्या पापाबद्दल वधस्तंभावर मरण पावला, तो पुरला गेला, पवित्र शास्त्रामध्ये त्याला पुन्हा मरणातून उठविण्यात आले आणि आजही तो जिवंत आहे. तो काल, आज युगानुयुगासारखाच आहे व सर्व मनुष्यजातीचा तो प्रभू आहे.

 नाताळाच्या दिवशी संपूर्ण मानवजातीला तारण, शांती, प्रीती, अहिंसेचा संदेश देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हे या जगामध्ये आले. आज अनेक धर्म, जाती, पोटजाती, पंथ, मानवाचे रंग, चालीरिती, निरनिराळय़ा संस्कृती असतील, पण प्रभू येशू या मानव जातीच्या पापाचे ओझे आपणावर घेण्यास जन्मास आला हे तितकेच सत्य आहे. या दिवसाला नाताळ ‘खिसमस’ असे म्हटले जाते. म्हणजेच प्रभू येशूचा जन्मदिन होय. म्हणून आज संपूर्ण मानव जातीला प्रभू येशूचे आपणावरील प्रेम जाणून घेणे गरजेचे आहे. कारण तोच एक मार्ग सत्य व जीवन आहे. असे पवित्र शास्त्र आपणास शिकविते, कारण मनुष्य जातीच्या पापक्षमेसाठी या प्रिय प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला आहे व तोच केवळ संपूर्ण मानव जातीला आध्यात्मिकरित्या जीवन देऊन नवीन जन्म देऊ शकतो.

 खिसमस किंवा नाताळ यासाठीच आहे की, संपूर्ण मानव जातीला कळावे की प्रभू येशू ख्रिस्त व त्यांची शिकवण आजही मानव जातीसाठी जिवंत अशी आहे. त्यांच्या जन्मदिनी ख्रिस्ताची हीच इच्छा आहे की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करावे व विश्वास ठेवून आपल्या पापांची क्षमा मिळवून घ्यावी. एवढेच नव्हे तर संपूर्ण मानव जातीने त्यांच्या प्रेम, दया, शांती, क्षमा, प्रीती या शिकवणीकडे वळावे, व त्यांच्याकडून सार्वकालिक जीवन मिळवून घ्यावे. हाच या नाताळाचा प्रभू येशूच्या जन्माचा खरा उद्देश आहे. मानव जातींपैकी कोणाचाही नाश होऊ नये तर प्रत्येकास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, म्हणून ख्रिस्तांचा जन्म या पृथ्वीतलावर झाला. त्यालाच नाताळ असे म्हटले जाते व प्रीतीस्तव त्याने स्वतःचा प्राणदेखील वधस्तंभावर दिला. अशा या कृपाळू, दयाळू व कनवाळू तारणाऱया ताऱयाचा जन्म दिवस म्हणजेच नाताळ होय.

– मि. प्रेम व्हीमल, रत्नागिरी