|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » क्रिडा » विजेंदर-अझुमू लढत आज

विजेंदर-अझुमू लढत आज 

वृत्तसंस्था /जयपूर :

क्यावसायिक मुष्टियुद्ध क्षेत्रात पदार्पण केल्यापासून आतापर्यंत अपराजित राहिला असला तरी भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगने शनिवारी होणाऱया अमुझूविरुद्धच्या लढतीचा निकाल गृहित धरलेला नसून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक व ओरिएन्टल अजिंक्मयपदे स्वतःकडेच राखण्यासाठी सज्ज झालेला आहे. 32 वषीय विजेंदर व अर्नेस्ट अमुझू यांच्यात सुपर मिडलवेट गटाची लढत शनिवारी सायंकाळी येथे होत आहे. याशिवाय भारताच्या अन्य काही मुष्टियोद्यांच्या लढतीही होणार आहेत.

‘फक्त एक निर्णायक पंच पुरेसा आहे, ज्यामुळे लढत निकाली होईल. खालचे मानांकन असलेले बॉक्सर्स वरचे मानांकन असलेल्या बॉक्सर्सना हरविल्याचे आम्ही अनेकदा पाहिले आहेत. त्यामुळे मी कोणत्याही बॉक्सरला गृहित धरलेले नाही,’ असे लढतीच्या पूर्वसंध्येला विजेंदर म्हणाला. ‘प्रेमात व युद्धात सर्व क्षम्य असते असे मानले जाते. ही लढतही युद्धासारखीच आहे. त्याचे मनोबल खचलेले असेल तर मला त्याचा आनंदच वाटेल,’ असेही तो म्हणाला. ब्रिटनचा स्टार बॉक्सर आमिर खानने वेगळे वजन गटाचे असले तरी विजेंदरविरुद्ध लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याबद्दलही विजेंदर बोलला.

आमिर खान लाईट वेल्टरवेट गटात  खेळतो. त्याने वेल्टरवेट गटात खेळण्याचा घेतलेला निर्णय त्याला अंगलट आला असून त्याला नॉकआऊट पराभव स्वीकारावा लागला आहे. विजेंदर सुपर मिडलवेट गटात खेळतो. जर आमिरविरुद्ध कधी खेळण्याची वेळ आल्यास आपण सज्ज असल्याचे त्याने म्हटले आहे. ‘आमिरने मला आव्हान दिले असल्याचे ऐकले आहे. आता आम्हाला एकमेकांना सामोरे जाणे योग्य ठरेल, असे मला वाटते. त्याच्याशी मुकाबला करण्यास मीही उत्सुक झालोय आणि पुढील वर्षी मी त्याच्याविरुद्ध नक्कीच लढेन,’ असे विजेंदर म्हणाला. आमिर खान हा माजी ऑलिम्पिक रौप्यविजेता असून व्यावसायिक वर्तुळात तो लाईट वेल्टरवेट गटाचा माजी वर्ल्ड चॅम्पियनही आहे.

विजेंदरने आतापर्यंत झालेल्या सर्व लढती जिंकल्या असून अझुमूविरुद्ध विजयी घोडदौड कायम राखण्याची त्याच्याकडून अपेक्षा केली जात आहे.