|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » रोहितचा 35 चेंडूत शतकी धडाका, लंकेचा धुव्वा!

रोहितचा 35 चेंडूत शतकी धडाका, लंकेचा धुव्वा! 

इंदोर / वृत्तसंस्था :

अवघ्या 35 चेंडूत शतक साजरे करणाऱया रोहित शर्माची 43 चेंडूतील 118 धावांची खेळी, लोकेश राहुलच्या तुफानी 89 धावा व या पराक्रमाला समयोचित गोलंदाजी लाईनअपच्या पूरक योगदानामुळे भारताने येथील दुसऱया टी-20 सामन्यात लंकेचा 88 धावांनी जबरदस्त धुव्वा उडवला शिवाय, ही मालिका 2-0 फरकाने येथेच खिशात घातली. संयुक्त विश्वविक्रमी शतक साजरे करणारा रोहित सामनावीर ठरला. भारताने या लढतीत निर्धारित 20 षटकात 5 बाद 260 धावा केल्या तर प्रत्युत्तरात लंकेने 17.2 षटकात सर्वबाद 172 धावा जमवल्या.

विजयासाठी 261 धावांचे तगडे आव्हान असताना कुसल परेराने एकाकी झुंज देत 37 चेंडूत 77 धावांची आतषबाजी केली. पण, त्याच्याशिवाय, उपूल थरंगा (29 चेंडूत 47) व निरोशन डिकवेला (19 चेंडूत 25) या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. भारतीय संघातर्फे यजुवेंद्र चहलने 52 धावात 4 तर कुलदीप यादवने 52 धावात 3 बळी घेतले. उनादकट व पंडय़ाने प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला. मॅथ्यूज दुखापतीमुळे फलंदाजीला उतरु शकला नाही.

रोहितची आतषबाजी

तत्पूर्वी, रोहित शर्माने लंकन गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधडय़ा उडवत अवघ्या 35 चेंडूतच शतक साजरे केले व या बळावर भारताने 5 बाद 260 धावांचा डोंगर रचला होता. रोहितने दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलेरच्या 35 चेंडूतील शतकाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. त्याने एकूण 43 चेंडूत 118 धावांची आतषबाजी केली. टी-20 क्रिकेटमधील रोहितचे हे दुसरे शतक ठरले असून भारतातर्फे ही टी-20 मधील सर्वात वेगवान शतकदेखील ठरले आहे.

जबरदस्त, उत्तुंग फटकेबाजीवर भर देणाऱया या हंगामी कर्णधाराने आपल्या 43 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार व 10 सणसणीत षटकार लगावले. त्याची फलंदाजी पॉवर-हिटिंग श्रेणीतील होती. शिवाय, त्याच्या या शतकी खेळीत प्रचंड आक्रमकता अगदी नसानसात ठासून भरलेली देखील होती. रोहित क्रीझवर असताना लंकन गोलंदाज, क्षेत्ररक्षक निव्वळ हतबल असल्याचे चित्र प्रकर्षाने दिसून आले. पूल, कट, ड्राईव्हसारख्या जबरदस्त फटक्यांच्या बळावर त्याने लंकन गोलंदाजी पुरती नेस्तनाबूत करुन टाकली.

सांघिक स्तरावर तिसऱया क्रमांकाच्या धावा

रोहितला लोकेश राहुलने देखील 49 चेंडूत 89 धावांसह अगदी समयोचित, समर्पक साथ दिली. या जोडीने अवघ्या 12.4 षटकातच 165 धावांची सलामी दिली, तेथेच जणू या लढतीचा निकाल निश्चित झाला होता. या फटकेबाजीसह भारताने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमवणाऱया संघांच्या यादीत संयुक्त दुसरे स्थानही संपादन केले. टी-20 मध्ये सर्वोच्च सांघिक धावांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर आहे. त्यांनी लंकेविरुद्ध एका टी-20 लढतीत 3 बाद 263 धावांचा डोंगर रचला. याशिवाय, लंकेने 2007 साली केनियाविरुद्ध 6 बाद 260 धावा फटकावल्या होत्या.

दरम्यान, हंगामी कर्णधार रोहित शर्माने दुष्मंता चमीराच्या गोलंदाजीवर थर्डमॅनवरील धनंजयाकरवी झेलबाद होण्यापूर्वी लंकन संघावर सातत्याने आक्रमणेच चढवली. जॅम-पॅक होळकर स्टेडियमवर त्याच्या फटकेबाजीने चाहत्यांमध्येही अर्थातच प्रचंड उत्साह संचारला होता. अवघ्या 8 दिवसांपूर्वी वनडे क्रिकेटमध्ये याच लंकन संघाविरुद्ध त्याने विक्रमी द्विशतक साजरे केले होते.

रोहितचा सहकारी सलामीवीर लोकेश राहुलने 6 धावांवर जीवदान लाभल्यानंतर 49 चेंडूत 89 धावा फटकावत याचा चांगलाच लाभ घेतला. आपले सर्व फटके व्हीमध्ये खेळत त्याने प्रतिस्पर्ध्यांना किंचीतही संधी दिली नाही. अर्थात, 19 व्या षटकात उत्तरार्धात त्याला शतकाने हुलकावणी दिली. नुवान प्रदीपच्या गोलंदाजीवर निरोशन डिकवेलाने त्याचा झेल टिपला. राहुलच्या खेळीत 5 चौकार व 8 षटकारांचा समावेश राहिला

Related posts: