|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » खडसेंना गळाला लावण्यासाठी

खडसेंना गळाला लावण्यासाठी 

विजय पाठक / जळगाव :

मुख्यमंत्रिपद न मिळाल्यापासून भाजपवर नाराज असलेले भाजपचे प्रस्थापित नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीची तीव्रता वाढली असून, त्यांना गळाला लावण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. खडसेंचे कार्यकर्तेदेखील पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत असून, खडसे पक्ष सोडण्याचा निर्णय कधीही घेऊ शकतात, असे चित्र पाहायला मिळत आहे.

जनसंघ व नंतर भाजपात गेल्या 40 वर्षांपासून सक्रिय असलेल्या एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हय़ात खऱया अर्थाने भाजप रूजवली, वाढवली. त्यामुळे गेली 15 वर्ष जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. जिल्हय़ातून काँग्रेसचे नामोनिशाण मिटविण्यात भाजपला यश आले. तर राष्ट्रवादीचे अस्तित्व संपले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हय़ात नव्हे; तर उत्तर महाराष्ट्रात नाथाभाऊंचा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनच प्रचार झाला आणि उत्तर महाराष्ट्राने भाजपच्या पारडय़ात भरभरून मते टाकली. एकनाथ खडसे यांनी पक्षाचा अत्यंत आक्रमक प्रचार करीत महाराष्ट्र पिंजून काढला. पक्षाला यश मिळाले. पण, ते   मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असले, तरी पक्ष नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना कौल दिला आणि खडसे नाराज झाले. क्रमांक दोनचे खाते देत त्यांची समजूत काढली गेली. मात्र, ही नाराजी वेळोवेळी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली व पक्षाची पहिली नाराजी ओढवून घेतली. त्यात खडसेंवर आरोपांच्या फैरी झडल्या. त्यातून त्यांना राजीनामा द्यावा लागला. पुणे जमीन प्रकरणाची चौकशी संपली, असली तरी अहवाल बाहेर आलेला नाही. त्यामुळे पक्ष खडसेंना मंत्रिमंडळात घेण्यास तयार नाही. यातून ही खडसेंची नाराजी वाढतच गेल्याचे दिसत आहे. संधी मिळेल तेव्हा विधानसभेत अथवा बाहेर खडसेंनी आपले पक्षाबद्दलचे नाराजीअस्त्र वापरणे सुरूच ठेवले आहे. परिणामत: पक्षाने त्यांना दोन हात दूर ठेवले आहे. दुसरीकडे नारायण राणेंना पक्ष जवळ करीत असल्याने खडसे अधिक दुखावले गेले आहे.

खडसेंसारखा दिलदार माणूस काँग्रेसमध्ये हवा

जळगाव जिल्हय़ात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे अशी भाजपात उभी फूट पडली असून, महाजन सत्तेत असल्याने मोठया संख्येने कार्यकर्ते महाजनांमागे आहेत. खडसेंनी आणलेले प्रकल्प जिल्हय़ाबाहेर नेले जात आहेत. महसूलमंत्री असताना त्यांच्याभोवतीचा गोतावळा, गर्दी ओसरली आहे. यातून खडसेंची बेचैनी वाढली आहे. या परिस्थितीचा फायदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस घेऊ पाहत आहेत. नागपूरला काँग्रेसच्या यशामती ठाकूर यांनी असा दिलदार माणूस आमच्या पक्षात येईल का म्हणून भावनात्मक साद घातली असता परिस्थिती काय घडवेल ते सांगता येत नाही, असे उत्तर खडसेंनी दिले आहे. पडद्याआडून काँग्रेसचे जिल्हयाचे प्रभारी आमदार भाई सावंत यांनीदेखील जिल्हयातील काँग्रेसजनांना खडसे पक्षात आले, तर जिल्हयातील काँगेसची स्थिती सुधारेल, असे सांगत पक्षात आणण्याच्या सूचना दिल्या.

Related posts: