|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोत दहा लाखांच्या ऐवजावर चोरटय़ांचा डल्ला

वास्कोत दहा लाखांच्या ऐवजावर चोरटय़ांचा डल्ला 

प्रतिनिधी/ वास्को

नवेवाडे वास्कोत नाताळाच्या पूर्वरात्री झालेल्या घरफोडीत सुमारे दहा लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. यात सोन्याचे दागिने व रोख रक्कमेचा समावेश आहे. सदर कुटुंब मध्यरात्री नाताळाच्या प्रार्थनेला गेल्याची संधी साधून चोरटय़ांनी मोठा डल्ला मारला. या प्रकरणी पोलीस तपास चालू आहे.

नवेवाडे वास्कोतील हनुमान मंदिराशेजारीच असलेल्या जॅक फर्नांडिस यांच्या घरात ही चोरी झाली. फर्नांडिस यांचे घर अगदी रस्त्याजवळच आहे. ते आपल्या कुटुंबीयांसह रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास नाताळच्या प्रार्थनेसाठी बाहेर पडले होते. रात्री दीडच्या सुमारास घरी परत येताच घराच्या दरवाजाचे कुलुप कोणी तरी तोडल्याचे या कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली.

रोकड हल्लीच बँकेतून आणली होती

या घरफोडीत चार बांगडय़ा, तीन सोनसाखळय़ा, दोन ब्रेसलेट व एक अंगठी मिळून सहा लाख रूपये किमतीचे सोने तसेच सुमारे चार लाख रूपयांची रोख मिळून सुमारे दहा लाख रूपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. रोख रक्कम त्यांना हल्लीच बँकेच्या कायम ठेवीतून प्राप्त झाली होती. या रक्कमेचे योग्य नियोजन करण्यापूर्वीच चोरांनी डल्ला मारला.

रात्री साडेबारा ते एकच्या दरम्याच झाली चोरी

फर्नांडिस कुटुंबांने प्रार्थनेला जाताना घरातील वीज बंद केली नव्हती. चोरांनीही अगदी रस्त्याच्या कडेला असलेल्या या घरात विजेच्या उजेडातच दरवाजा तोडून कपाटातील लाखोंचा ऐवज गुंडाळून ही चोरी केली. नाताळाच्या प्रार्थनेच्या निमित्ताने नवेवाडेतील या रस्त्यावर रविवारी रात्री नागरिकांची ये जा होती. परंतु हा चोरीचा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. ही चोरी रात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान, झालेली असण्याची शक्यता या प्रकरणातील चौकशीत दिसून आली आहे.

वास्को पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून तपासाला सुरूवात केली आहे. सोमवारी श्वानाच्या मदतीने पोलिसांनी चोराचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. दरवर्षी नाताळाच्या पूर्वरात्री वास्को परिसरात चोरीचा प्रकार घडत असतो. प्रार्थनेच्या निमित्ताने ख्रिश्चन कुटुंबीय घराबाहेर पडत असल्याची संधी चोर दरवर्षी घेत असतात. यंदाही अशा घटनांमध्ये खंड पडलेला नाही.

Related posts: