|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत नागरिकांकडून आयलँड उद्ध्वस्त

मिरजेत नागरिकांकडून आयलँड उद्ध्वस्त 

मिरज :

शहरातील यशवंत बँकेजवळ बोकड चौकात उभारलेला कारंजाचा आयलँड नागरिकांनी उद्ध्वस्त केला. कारंजाचे पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव होण्याबरोबर घाणीमुळे सातत्याने दुर्गंधी सुटत असल्याने सदरचा आयलँड काढून टाकावा, असा ठराव मनपा सभेत करण्यात आला होता. पण त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने संतप्त नागरिकांनी गुरूवारी तो उद्ध्वस्त केला. दरम्यान, सांगली जिल्हा सुधार समितीने आयलँड बेकायदेशीर तोडून नुकसान केल्याप्रकरणी संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

चौक सुशोभिकरणाच्या नावाखाली काही वर्षांपूर्वी शहरातील मुख्य चौकात आयलँड उभे करण्यात आले आहेत. मध्यवर्ती यशवंत बँकेलगत असलेल्या बोकड चौकातही अशा स्वरुपाचा आयलँड बसवून कारंजाही सुरू करण्यात आला होता. प्रारंभी याचे या भागातील नागरिकांनी स्वागत केले होते. नव्याचे नऊ दिवस म्हणून प्रशासनानेही स्वच्छतेच्या दृष्टीने त्याकडे लक्ष दिले होते. पण नंतर मात्र, आयलँडमध्ये पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. शिवाय या पाण्यात कचरा साचल्याने दुर्गंधी सुटली होती. आयलँडच्या स्वच्छतेबाबत या भागातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. पण आजतागायत त्याकडे दुर्लक्ष झाले होते. वाढती दुर्गंधी व डासांच्या प्रादुर्भावामुळे सदरचा आयलँड काढून टाकावा, अशी मागणी झाल्याने मनपा सभेत तसा ठरावही करण्यात आला होता.

मासिक सभेत ठराव होऊनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गुरूवारी येथील नागरिकांनी आयलँड उद्ध्वस्त केला. नागरिकांकडून आयलँड तोडला जात असतानाही प्रशासनाचे अधिकारी फिरकले नाहीत. काही अवधीत हा आयलँड उद्ध्वस्त करण्यात आला होता. आयलँडमध्ये साचलेले पाणी आणि निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे संतप्त नागरिकांनी कृत्य केल्याचे येथील काही नागरिकांतून सांगण्यात आले.

Related posts: