|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपात विकासकामांच्या शंभरपेक्षा जास्त फाईली सापडेनात!

मनपात विकासकामांच्या शंभरपेक्षा जास्त फाईली सापडेनात! 

प्रतिनिधी /सांगली :

महापालिकेमध्ये विविध विभागात मंजुरीसाठी पाठविलेल्या शंभरावर फाईली सापडेना झाल्या आहेत. आरोग्य, बांधकाम आदी विभागातील फाईलींचा समावेश असून गायब फाईली शोधण्यासाठी नगरसेवकांची पळापळ सुरू झाली आहे. दरम्यान फाईली गायब होत नसल्याने संतापही व्यक्त केला जात आहे.

महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. पुढील वर्षाच्या मध्यवधीमध्ये प्रत्यक्षात निवडणूक मतदान होण्याची तर दोन ते तीन महिन्यात निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी वॉर्डातील कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांनी धावपळ सुरू केली आहे. मात्र टेंडर प्रक्रिया, समज, वर्क ऑर्डर आदीसाठी दिलेल्या फाईली संबधित विभागात सापडेना झाल्या आहेत. महापालिकेत फाईलीचा प्रवास मोठा आहेत. एक फाईल किमान चार ते पाच टेबलावर गेल्याशिवाय आणि नंतर त्यामध्ये शेरा आल्यानंतर पुन्हा त्याच प्रवासाने फाईल फिरते यामुळे एक फाईल मार्गी लागण्यासाठी सतत पाठपुरावा करूनही किमान दोन -तीन महिने निकाली निघत नाही.

निवडणूक जवळ आल्याने नगरसेवकांनी अशा विविध विकासकामांच्या फाईलींचा पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र अनेक फाईली  संबधित विभागात सापडत नसल्याच्या तक्रारी त्यांच्यातून केल्या जात आहेत. ज्या विभागात फाईल पाठविली तेथून फाईल पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तेथे ही फाईल आली नसल्याची उत्तरे दिली जात असल्याने नगरसेवक बेजार झाले आहेत. अशा प्रकारे पंधरा ते वीस नगरेवकांच्या सुमारे शंभरावर फाईली गायब असल्याचे सांगण्यात आले. कामे सुचविणे, त्यानंतर फाईली तयार करणे, नंतर मंजुरीसाठी या विभागातून त्या विभागात ठिय्या मारणे ही करसत करावी असताना सर्व कागदपत्रे गोळा केल्यानंतर फाईल सापडत नसल्याने नगरसेवकांतून मनपाच्या कारभाराबाबत मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

Related posts: