|Monday, December 9, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » है मुश्किल जीना यहाँ

है मुश्किल जीना यहाँ 

‘ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ जरा हट के जरा बचके यह है बॉम्बे मेरी जान’ हे गीत गायला बरं वाटतं पण, खरंच रावणाची ही दुसरी लंका आता माणसांच्या जगण्यास मुश्किल झाली आहे काय अशी शंका यावी अशा आगीच्या तांडवात ती जळते आहे. पाण्याच्या लोटात वाहते आहे, प्रशासकीय बेपर्वाई आणि भ्रष्टाचारी मार्गावर चिरडली जात आहे आणि बेदरकार गुन्हेगारी वृत्तीच्या गटारगंगेतून इथली माणुसकीही वाहून जाते आहे. या मुंबईला आभाळ, पाताळ, समुद्र काहीही पुरेनासा झाला आहे. माणसासहीत सगळं काही आता ती गिळायला लागली आहे. आवाक्याच्या बाहेर चाललेल्या या मुंबईने 29 डिसेंबरच्या रात्रीत आणखी 14 जीव गिळले. आगीच्या एका तडाख्यात इथल्या व्यवस्थेचे पोलखोल झाले. ‘खुद काटे गले सबके कहे इसको बिजनेस’ हे गाण्यातले बोल खरे ठरवत बेकायदेशीररित्या चालवलेल्या पबमध्ये बेकायदाच पेटवलेल्या हुक्क्याची ठिणगी पडली आणि बघता बघता 14 जीव जळाले. 12 होरपळले आणि कोटय़वधींच्या हृदयाचा ठोका चुकला. स्वप्नांच्या नगरीत ती पूर्ण करण्यासाठी धावता धावता विरंगुळय़ाच्या चार क्षणासाठी काढलेला वेळ काळ ठरला या काळाने आपल्या घरच्या कोणाचा बळी घेतला नाही ना? या शंकेने हजारो मुंबईकरांनी रात्र जागून काढली नसेल तरच नवल. ऑगस्ट, सप्टेबर आणि डिसेंबरच्या 29 तारखांना घडलेल्या तीन दुर्घटनांमध्ये 40 मुंबईकरांनी आपले प्राण गमावले. मुंबईच्या भाग्यात रोज दुर्घटना लिहिलेल्या आहेत. परळच्या कमला मिलपासून एकाच किलोमीटरवर एलफिस्टन पुलावर माणसं चेंगरून मेली, तेव्हा मुंबई हळहळली, कळवळली, ओक्साबोक्सी रडली. आपलं कोणी गेलं म्हणूनच नव्हे हजारोंच्या पायाखाली चिखलासारखे तुडवले गेलेल्यात कदाचित आपणही असू शकलो असतो या भयानक वास्तवाने अनेकांना रडवले. फरसाणा कारखान्यात  12 कामगारांचा कोळसा झाला. मॅनहोलमध्ये पडून जगात मान्यता पावलेल्या धन्वंतरी गमावला. एकावर्षात मुंबईच्या भेंडीबाजारपासून घाटकोपरपर्यंतच्या दुर्घटनांमध्ये 62 माणसं इमारतीच्या ढिगाऱयाखाली गाडली गेली. अंगावर झाडं पडून अर्धाडझन माणसं होत्याची नव्हती झाली. घाईच्या जगण्याचं ऋण फेडत रेल्वे, रस्ते अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांची तर गणतीच करायची नाही. कायमचे अपंगत्व आलेले खीजगणतीतही धरायचे नाहीत. कारण त्या तर छोटय़ा मोठय़ा घटना. जगणं मुश्किल करणाऱया असल्या तरी त्यांना मुर्दाडासारखं ग्राहय़  धरून चालायचं हे जगणं मरणाहून वाईट. पण, ते जगण्याची वेळ कोटय़वधी लोकांच्यावर आलेली आहे. मुंबईत रोज ये-जा करणारे आणि राहणारे तीन, चार कोटीहून अधिक लोक म्हणजे या मुंबईवरचं ओझं असतीलही पण, प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि ते स्वप्नं पुरं करण्यासाठी मरणालाही कवटाळायची तयारी नसली तरी त्याची रिस्क घेऊनच जो, तो वावरतो आहे. मरण येत नाही तोपर्यंतचा जगण्याचा हा चक्रव्यूह भेदत रहायचे इतकेच त्यांच्या हाती. हे जगणं म्हणावं की मरणं याचा सवाल ते विचारणार कुणाला आणि त्यांचं ऐकणार कोण आहे?

परळच्या पब मालकांना वाचवण्यासाठी आगीची घडलेली दुर्घटना ही शॉर्टसर्किटने घडली असं भासवण्याचं षडयंत्र रचलं जात होतं. या जागेवर अतिक्रमण करून बांधकामं केली आहेत अशी तक्रार करणाऱया कार्यकर्त्याला आम्हाला येथे कोणतीही अनधिकृत बांधकामं आढळली नाहीत असं पत्र हाती ठेवलं जातं. याला म्हणावं काय? टेरेसवर खोललेली अनधिकृत पब, हॉटेल्स आणि त्यात चालणारे हुक्का व अन्य अवैध व्यवसाय अनेकांच्या मृत्यूला निमंत्रण ठरू शकतात याची ना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱयांना चिंता होती ना मुंबई पोलिसांना. सर्व काही ठाऊक असलं तरीही चाललेलं चालू द्यायचं आणि त्या मोबदल्यात मोठी रक्कम उकळायचं हा उद्योग तर या नगरीत सर्वमान्य झालाय. मुंबापुरी ही आता गरीब बिचाऱया कोळय़ा, भंडाऱयांची राहिली नाही. ती चोर, लुटारू, दरोडेखोरांची आधीच झाली होती. पण, आता ती सरळ सरळ मृत्यूचा बाजार करणाऱया दळभद्रींची बनली आहे. त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. फार तर काय? निलंबित करतील. प्रकरण निवलं की पुन्हा थोडेफार पैसे खर्चून सेवेत रूजू होता येईल. पण, आज हाती येणारी लक्ष्मी कशाला सोडा, मी नाहीतर दुसरा कोणीतरी मिळवणारच आहे. तर मग मी का नाही? अशा मानसिकतेच्या लोकांनी या मुंबईची सुरक्षितता विकून टाकली आहे. किमान काही अटी, नियमांचा पालन करायला लावणे देखिल जेथे यंत्रणा करायला तयार नाहीत तिथे लोकांनी मरायलाच तयार राहण्याशिवाय दुसरा पर्याय कुठे उरतोय़?  आगीतून सुटण्याचा मार्ग सापडत नाही, प्रसाधन गृहातच महिलांचा गुदमरून मृत्यू होतो, लोक पायाखाली तुडवले जातात. आगीत 14 लोक जळाल्यानंतर अग्नीशमन विभाग आग आटोक्यातचा बडेजाव सांगतो. या सगळय़ाच गोष्टी संताप वाढविणाऱया आहेत. लोकांनी सहन तरी किती करायचं, या संतापाला आवर तरी किती घालायचा? लोकं चिरडली अश्रू ढाळा, आपण त्यात नव्हतो म्हणून देवाचे आभार माना आणि जगण्याचे अडथळे पार करत मरणाच्या रस्त्याने चालत रहा हा खेळ खेळायचा तरी किती काळ आणि असं जगायचं तरी कसं? हा सर्वसामान्य मुंबईकरांसमोरचा प्रश्न आहे. साध्या, सामान्य नियमांनीही ही मुंबई चालणार नाही का? समुद्राच्या अगदी काठापर्यंत बांधकामांना शासन परवानगी देण्याच्या तयारीत आहे, रस्ते, उड्डाणपुलांना तर धरबंद नाही. मुंबईवर दुसरी, तिसरी मुंबई उभी केली आहे. या शहरात किती लोक राहणार? त्यांची सोय कशी होणार? या शहराचे भविष्य काय? एकाच भागात किती व्यवहार वाढवणार? नियंत्रण कसे ठेवणार? याचे उत्तर ना सरकारकडे आहे ना मुंबई महापालिकेकडे. यांच्या दुर्लक्षाने जनतेचा जीव चालला आहे. या मुंबईला आणि मुंबईकरांना सुरक्षित जीवन कोण प्रदान करणार हाच प्रश्न आहे.

Related posts: