|Sunday, September 22, 2019
You are here: Home » उद्योग » महाराष्ट्रातील सर्वाधिक कंपन्यांची मान्यता रद्द

महाराष्ट्रातील सर्वाधिक कंपन्यांची मान्यता रद्द 

कंपनी व्यवहार मंत्र्यांची लोकसभेत माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नियमांचे पालन करण्यास अपयशी ठरलेल्या 2.26 लाख कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. दोन अथवा त्यापेक्षा अधिक वर्षांहून अधिक कालावधीचा रिटर्न भरण्यात आलेला नाही, त्या कंपन्यांची मान्यता रजिस्टार ऑफ कंपनीजकडून रद्द करण्यात आली असे अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सांगितले.

2017-18 या वर्षात सलग दोन अथवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी वार्षिक रिटर्न न भरणाऱया कंपन्यांची ओळख पटविण्यात आली आहे. देशात 2.97 लाख कंपन्यांचे कोणतेही आर्थिक व्यवहार होत नसल्याचे समोर आले आहे. रजिस्टार ऑफ कंपनीजकडून ओळख पटविण्यात आलेल्या कंपन्यांपैकी 12 डिसेंबर 2017 पर्यंत 2,66,166 कंपन्यांची मान्यता रद्द करण्यात आली. कंपनी कायदा 2013 च्या कलम 248 नुसार ही कारवाई करण्यात आल्याचे जेटली म्हणाले. कलम 248 नुसार आर्थिक व्यवहार करण्यात येत नसलेल्या कंपन्यांची मान्यता हटविण्याचा अधिकार उद्योग व्यवहार मंत्रालयाला देण्यात आला आहे.

नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत देशभरात एकूण 17,20,318 कंपन्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. यापैकी 5.38 लाख कंपन्या बंद झालेल्या आहेत असे जेटली यांनी सांगितले. 2.26 लाख कंपन्यांच्या संचालकांचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. भविष्यात कोणतीही कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत ही खाती बंद राहणार आहेत. 3 लाखापेक्षा अधिक संचालकांची ओळख पटविण्यात आली आहे. यामध्ये नोंदणी रद्द करण्यात आलेल्या कंपन्यांतील संचालकांचाही समावेश आहे, असे अर्थ राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी सांगितले.