|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नाटय़रसिक अविनाश काळे यांना रंगकर्मींचा पाठिंबा

नाटय़रसिक अविनाश काळे यांना रंगकर्मींचा पाठिंबा 

सगीत राज्य नाटय़ स्पर्धेचे केंद्र हलविण्याच्या निषेधार्थ उपोषण

विविध संस्था प्रतिनिधींची उपोषण स्थळी भेट

प्रतिनिधी /रत्नागिरी

संगीत राज्य नाटय़ केंद्र रत्नागिरी येथेच रहावे, यासाठी पावसचे संगीत नाटय़रसिक अविनाश काळे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. काळे यांच्या उपोषणाला रत्नागिरीतील रंगकर्मींनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱयाने या ठिकाणी उपस्थित राहण्याचे औदार्य दाखवले नसल्याने रंगकर्मींतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

संगीत नाटकांच्या स्पर्धेचे केंद्र कोल्हापूरला हलवण्यात येत असल्याबद्दल रत्नागिरीकर संगीत नाटय़ रसिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रंगकर्मी, नाटय़संस्था, तसेच नाटय़ रसिकही गतवर्षी रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचने खेचून आणलेल्या रत्नागिरी केंद्रावर स्पर्धा व्हावी, यासाठी आग्रही आहेत. संचालनालयाने पुढील वर्षी ही स्पर्धा स्पर्धेचे अर्ज भरण्याआधी जाहीर करून राज्यात इतरत्र हलवावी. मात्र यंदा मात्र रत्नागिरीतच व्हावी, अशी आग्रही मागणी रत्नागिरीतील नाटय़ रसिकांची आहे. या नाटय़ रसिकांचे प्रतिनिधीत्व करत पावस येथील अविनाश काळे यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

उपोषणस्थळी गुरूवारी रत्नागिरीतील विविध नाटय़संस्थांचे 60 हून अधिक प्रतिनिधी, रंगकर्मीनी भेट देऊन काळे यांना पाठिंबा दर्शवला. यामध्ये राधाकृष्ण कलामंचचे सुनील तथा दादा वणजू, खल्वायनचे श्रीनिवास जोशी, नाटय़ परिषदेच्या आसावरी शेटय़े, सतीश दळी, गायिका संध्या सुर्वे, उषा काळे, आनंद पाटणकर, संजना पांचाळ, विनीत भट, माधवी लेले, सनातन रे†िडज, सुहास साळवी आदींचा समावेश आहे.

सांगलीकरांचाही काळेंना पाठिंबा

कोल्हापूर केंद्रावर संगीत राज्य नाटय़ स्पर्धेचे केंद्र हलवण्यास सांगलीकरांकडूनही नकार येत आहे. कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाटय़गृहात ही स्पर्धा होणार आहे. मात्र ध्वनी व्यवस्थेसह पडदे लावण्यासह संगीत नाटकासाठीच्या अन्य सुविधांची वानवा आहे. त्यामुळे काळे यांना दूरध्वनी करून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत सांगलीकरांनीही रत्नागिरी केंद्रावर स्पर्धा घेण्यात यावी, असे मत नोंदवल्याचे काळे यांनी सांगितले.

Related posts: