|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » द. आफ्रिका सर्वबाद 286, भारत 3 बाद 28!

द. आफ्रिका सर्वबाद 286, भारत 3 बाद 28! 

केपटाऊनमधील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांची प्रारंभी पडझड

वृत्तसंस्था/ केपटाऊन

मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या स्वप्नवत गोलंदाजीनंतरही पहिल्या डावात सर्वबाद 286 धावांपर्यंत मजल मारणाऱया यजमान दक्षिण आफ्रिकन संघाने भारताला दिवसअखेर 3 बाद 28 असे खिंडीत पकडत कसोटी क्रिकेटमधील चढउतारांची शुक्रवारी चांगलीच प्रचिती दिली. दौऱयातील पहिल्यावहिल्या कसोटीत प्रारंभी, भुवनेश्वरने दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 12 अशी दैना उडवली होती. पण, डिव्हिलियर्स व प्लेसिस यांनी शतकी भागीदारी साकारल्याने यजमान संघाला त्यातून सावरता आले. प्रत्युत्तरात भारताची मात्र दिवसअखेर 3 बाद 28 अशी पडझड झाली. मुरली विजय (1), धवन (16) व विराट कोहली (5) स्वस्तात बाद झाले तर चेतेश्वर पुजारा (5), रोहित शर्मा (0) नाबाद राहिले.

दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद 286 धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय सलामीवीर मैदानात उतरले खरे. पण, सलग पडझडीमुळे विराटसेनेला चांगलेच धक्के बसले. मुरली विजयने फिलँडरच्या चेंडूवर एल्गारकडे झेल दिला तर धवनने स्टेनकडे परतीचा झेल दिल्याने भारताला आणखी एक धक्का बसला. त्यातच कर्णधार विराट कोहलीने मॉर्कलच्या गोलंदाजीवर डी कॉककडे झेल दिल्याने भारताची चांगलीच दैना उडाली.

तत्पूर्वी, भुवनेश्वरने लागोपाठ धक्के दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची देखील या पहिल्याच कसोटीत प्रारंभी चांगलीच तारांबळ उडाली होती. भुवीने आपल्या पहिल्या तीन षटकातच आफ्रिकेचे तीन आघाडीवीर बाद करत यावेळी खळबळ उडवून दिली होती. प्रारंभी, त्याने पहिल्या षटकातील तिसऱयाच चेंडूवर डीन एल्गारला यष्टीमागे झेल देणे भाग पाडले तर पुढील षटकात ऍडन मॅरक्रमला (5) एका अप्रतिम इनस्विंगरवर पायचीत करत त्याने आणखी एक धक्का दिला. इतके कमी असावे की काय म्हणून त्याने हाशिम आमलाला देखील तंबूत धाडले आणि यावेळी 3 षटकात 1 निर्धाव व 5 धावात 3 बळी, असे भेदक पृथ्थकरण नोंदवले.

एबीडी-प्लेसिसची शतकी भागीदारी

त्यानंतर मात्र एबी डिव्हिलियर्स व प्लेसिस यांनी सावध पवित्र्यावर भर देत डाव सावरण्याला पहिली पसंती दिली. केवळ खराब चेंडूवरच फटकेबाजी हे समीकरण नजरेसमोर ठेवत त्यांनी धावफलकही हलता ठेवला. विराटने ही जोडी फोडण्यासाठी अनेकदा गोलंदाजीत बद केले. पण, या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 114 धावांची भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणण्यात मोलाचा वाटा उचलला. अर्थात, धोकादायक ठरु पाहणाऱया भुवनेश्वरच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यात ही जोडी अजिबात मागे नव्हती. भुवीच्या एकाच षटकात चक्क 17 धावा वसूल करत त्यांनी आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले. अवघ्या 63 चेंडूतच त्यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली, यावरुनही त्यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला. अपवाद म्हणून 17 व्या षटकात शमीच्या गोलंदाजीवर प्लेसिसचा अंदाज चुकला. पण, यावेळी दुसऱया स्लीपवरील विराट कोहलीला झेल टिपणे दृष्टिक्षेपात नसल्याने तो बचावला.

अनुभवी इशांतऐवजी संघात आलेल्या पदार्पणवीर बुमराहने पहिल्या स्पेलमध्ये दोन्ही फलंदाजांना सातत्याने पेचात टाकले. पण, तरीही त्याला प्रारंभी ब्रेकथ्रू मिळवता आला नव्हता. यादरम्यान एबी डिव्हिलियर्सने 55 चेंडूतच कसोटीतील 41 वे अर्धशतक साजरे केले. पुढे, पदार्पणवीर बुमराह (1/73) व हार्दिक पंडय़ा (1/53) यांनी अनुक्रमे डिव्हिलियर्स व प्लेसिस यांना बाद करत मार्गातील मोठे अडथळे दूर सारले. बुमराहने डिव्हिलियर्सला तंबूत धाडताना कारकिर्दीतील पहिला बळी नोंदवला. डी कॉकला (43) भुवनेश्वरने बाद केले तर केशव महाराज अश्विनच्या अचूक फेकीवर धावचीत झाला. फिलँडर (23) व रबाडा (26) परतल्यानंतर मॉर्नी मॉर्कल (2) जणू हजेरी लावण्यासाठी मैदानात आला होता. 

धावफलक

दक्षिण आफ्रिका पहिला डाव : डीन एल्गार झे. साहा, गो. भुवनेश्वर 0 (3 चेंडू), मॅरक्रम पायचीत भुवनेश्वर 5 (11 चेंडूत 1 चौकार), हाशिम आमला झे. साहा, गो. भुवनेश्वर 3 (10 चेंडू), एबी डिव्हिलियर्स त्रि. गो. बुमराह 65 (84 चेंडूत 11 चौकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. साहा, गो. पंडय़ा 62 (104 चेंडूत 12 चौकार), क्विन्टॉन डी कॉक झे. साहा, गो. भुवनेश्वर 43 (40 चेंडूत 7 चौकार), व्हरनॉन फिलँडर त्रि. गो. मोहम्मद शमी 23 (35 चेंडूत 4 चौकार), केशव महाराज धावचीत (अश्विन) 35 (47 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), कॅगिसो रबाडा झे. साहा, गो. अश्विन 26 (66 चेंडूत 1 षटकार), डेल स्टेन नाबाद 16 (31 चेंडूत 1 चौकार), मॉर्नी मॉर्कल त्रि. गो. अश्विन 2 (9 चेंडू). अवांतर 6. एकूण 73.1 षटकात सर्वबाद 286.

गडी बाद होण्याचा क्रम

1-0 (एल्गार, 0.3), 2-7 (मॅरक्रम, 2.6), 3-12 (आमला, 4.5), 4-126 (डिव्हिलियर्स, 32.6), 5-142 (प्लेसिस, 35.5), 6-202 (डी कॉक, 44.5), 7-221 (फिलँडर, 50.2), 8-258 (केशव महाराज, 62.2), 9-280 (रबाडा, 69.3), 10-286 (मॉर्कल, 73.1).

गोलंदाजी

भुवनेश्वर 19-4-87-4, मोहम्मद शमी 16-6-47-1, बुमराह 19-1-73-1, हार्दिक पंडय़ा 19-1-73-1, अश्विन 7.1-1-21-2.

भारत पहिला डाव : मुरली विजय झे. एल्गार, गो. फिलँडर 1 (17 चेंडू), शिखर धवन झे. व गो. डेल स्टेन 16 (13 चेंडूत 3 चौकार), चेतेश्वर पुजारा खेळत आहे 5 (18 चेंडूत 1 चौकार), विराट कोहली झे. डी कॉक, गो. मॉर्कल 5 (13 चेंडू), रोहित शर्मा खेळत आहे 0 (5 चेंडू). अवांतर 1. एकूण 11 षटकात 3 बाद 28.

गडी बाद होण्याचा क्रम

1-16 (विजय, 4.4), 2-18 (धवन, 5.2), 3-27 (विराट, 8.1).

गोलंदाजी

फिलँडर 4-1-13-1, डेल स्टेन  4-1-13-1, मॉर्नी मॉर्कल 2-2-0-1, रबाडा 1-0-1-0.

बुमराहचे पदार्पण, उपकर्णधार अजिंक्य रहाणे मात्र संघाबाहेर

दक्षिण आफ्रिकन दौऱयातील या पहिल्यावहिल्या कसोटी लढतीसाठी भारताने मुंबईकर दिग्गज फलंदाज व उपकर्णधार अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा राखीव खेळाडूत बसवण्याचा धक्कादायक निर्णय अंमलात आणला. भारतीय संघ या लढतीत 4 जलद-मध्यमगती गोलंदाजांसह खेळत असून जसप्रीत बुमराहला येथे कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. मध्यमगती गोलंदाजीच्या आघाडीवर भारताने इशांत शर्मा व उमेश यादवऐवजी मोहम्मद शमी, भुवनेश्वर यांना संधी दिली. याशिवाय, बुमराह व पंडय़ाचा संघात समावेश राहिला. एकमेव फिरकीपटू या नात्याने अश्विनला संधी लाभली.

 

आकडे बोलतात

1

आशिया खंडाबाहेर विदेशी संघाचे पहिले 3 फलंदाज स्वस्तात बाद करण्याची कामगिरी भारताला यापूर्वी एकदाच करता आली आहे. 2006-07 मधील दौऱयात त्यांनी जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 5 अशी दाणादाण उडवली होती. शुक्रवारी येथे त्यांनी आफ्रिकेला पुन्हा एकदा 3 बाद 12 अशा बिकट स्थितीत खिंडीत पकडले. नंतर सुदैवानेच आफ्रिकेला यातून माग काढता आला.

2

मागील 10 वर्षात भारतीय संघातर्फे आघाडीच्या चारही मध्यमगती गोलंदाजांनी एका कसोटी डावात प्रत्येकी किमान 1 तरी बळी घेण्याची ही केवळ दुसरी वेळ ठरली. यापूर्वी, 2011-12 मध्ये वाका कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.

7-1

केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेने मागील 10 वर्षात खेळलेल्या 11 सामन्यात 7 विजय व 1 पराभव अशी कामगिरी नोंदवली आहे. अर्थात, या 11 सामन्यात त्यांना केवळ दोनच वेळा नाणेफेक जिंकता आली आहे.

1992

भुवनेश्वर कुमारने विदेश दौऱयातील तिसऱयाच चेंडूवर संघाला पहिले यश प्राप्त करुन दिले. विदेशात सर्वात लवकर यश संपादन करुन देण्याचा विक्रम कपिलच्या खात्यावर आहे. त्याने 1992-93 च्या दौऱयात जिम्मी कूकला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते.

2013

एबी डिव्हिलियर्स व फॅफ डय़ू प्लेसिस यांनी यापूर्वी 2013 मध्येही कसोटीत भारताविरुद्ध 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी साकारली होती. डिसेंबर 2013 मध्ये जोहान्सबर्ग कसोटीत धावांचा पाठलाग करताना या उभयतांनी 205 धावांची भागीदारी साकारली होती.

Related posts: