|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वीज दरात प्रतियुनिट 5 ते 50 पैसे वाढ होणार

वीज दरात प्रतियुनिट 5 ते 50 पैसे वाढ होणार 

खात्याची 163 कोटींची नुकसानी भरुन काढणार

प्रतिनिधी/ पणजी

वीज दरात प्रति युनिट 5 पैसे ते 50 पैसे दरम्यान वाढ करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला असून तसा प्रस्ताव संयुक्त वीज अधिनियमन मंडळाला मान्यतेसाठी पाठविला आहे. गेल्या चार वर्षात राज्याला रु. 163 कोटींचे नुकसान झालेले असून अत्यल्प अशा वीज दरवाढीमुळे राज्याला वर्षभरात सुमारे रु. 90 कोटींचा महसूल प्राप्त होऊ शकतो. दरम्यान, गोवा सरकारने 3 लाख वीज मिटर्स खरेदी केले असून या महिन्याच्या अखेरीस सर्वत्र डिजिटल मिटर्स बसविले जाणार आहेत.

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी वरील माहिती दिली. गोव्याचे वीज दर हे शेजारीलच असे नव्हे तर देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत अत्यल्प आहेत.

चार वर्षांत 163 कोटींचा फटका

वीजमंत्री म्हणाले की आम्ही प्रतियुनिट 3 रु.45 पैसे या दराने वीज खरेदी करतो. प्रत्यक्षात ग्राहकांना रु. 1.25 पैसे या दराने प्रतियुनिट देतो. केवळ मोठय़ा उद्योगांना वीज दर जादा आहे. त्यातून जो काही लाभ होतो त्याद्वारे वीज खात्याचे व्यवहार होतात. गेल्या चार वर्षात वीज खात्याला रु. 163 कोटींचा आर्थिक फटका बसला. विजेचे दरही वाढलेले आहेत, मात्र वीज खात्याने पाच वर्षात ग्राहकांच्या वीज दरात वाढ केली नव्हती. गोव्यातले वीज दर हे अत्यंत कमी आहेत आणि आमचा तोटाही वाढत आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन वीज दरात नाममात्र वाढ करण्याचे ठरविले आहे. सर्वसाधारणपणे प्रतियुनिट 5 पैसे दरवाढ होईल. टप्प्याटप्प्याने ही वाढ कमाल 50 पैसे प्रतियुनिट व्यवसायिक वापराच्या विजेसाठी होऊ शकते.

या संदर्भातील प्रस्ताव तयार करुन मान्यतेसाठी तो वीज अधिनियम मंडळाला पाठविलेला आहे. ते बैठक घेऊन जनतेची मते मिळवून नंतर निर्णय घेतील, असे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर म्हणाले.

राज्यात 60 हजार वीज मिटर्स बंद

गेल्या चार वर्षात सुमारे 60 हजार वीज मिटर्स बंद पडलेले आहेत. यात घरगुती वीज वापरणारे ग्राहक आहेत, त्याहीपेक्षा कित्येक व्यवसायिक व उद्योगांचे वीज मिटर्स बंद पडल्याचे आढळून आले आहे. यामुळे राज्य सरकारला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला आहे.

 तीन लाख डिजिटल मिटर्सची खरेदी

आता गोवा सरकारने डिजिटल मिटर्स खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तीन लाख डिजिटल वीज मिटर्स बसविले जातील. केंद्र सरकारने त्याकरता रु. 50 कोटींची आर्थिक मदत दिली असल्याचे मंत्री मडकईकर यांनी सांगितले. या महिन्याच्या अखेरीस राज्यातील सर्वच ग्राहकांचे वीज मिटर्स बदलण्याचे काम सुरु होईल, अशी माहिती वीजमंत्र्यांनी दिली.

सर्वसामान्य ग्राहकांना कोणताही चिमटा न काढता आम्ही नाममात्र वीज दरवाढ करणार आहोत. निर्माण झालेली तूट भरुन काढायची कशी? असा सवालही मंत्री मडकईकर यांनी केला.

Related posts: