|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हुतात्मा जगन्नाथ शिंदे स्मृती निवासाची दुरवस्था

हुतात्मा जगन्नाथ शिंदे स्मृती निवासाची दुरवस्था 

किरण बनसोडे/सोलापूर

देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात मोठ योगदान दिलेल्या चार हुतात्म्यांपैकी एक हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांच्या लकी चौकाजवळील स्मृती निवासाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी सर्वत्र कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे पालिका प्रशानाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून हुतात्म्यांच्या आठवणी जपण्याऐवजी पालिकेकडून त्याची अवहेलनाच सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.

सोलापूरमधील हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसुल कुर्बान हुसेन यांचे स्वातंत्र्य लढय़ात योगदान मोठे आहे. मार्शल लॉ च्या काळात त्यांच्यावर खटला होऊन त्यांना फ्ढाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. दि. 12 जानेवारी 1930 रोजी त्यांना फ्ढाशी देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी या चार विरांनी बलिदान देत सोलापूरचे नाव देशाच्या नकाशावर कोरले. त्यामधील हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचे लकी चौकाजवळ निवासस्थान आहे.

हुतात्मा शिंदे यांच्या निवासाची दुरवस्था झाली आहे. स्मृती निवासाचे प्रवेशद्वार बंद आहे. या प्रवेशद्वारावर लॅकमेचे पोस्टर लावले आहे. हे निवासस्थान बंद असून, त्या समोर कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील स्वच्छता केली नसल्याचे दिसून येते. यापूर्वी येथे अंगणवाडी भरत होती. तीही बंद असल्याने याकडे कोणाचेही लक्ष नाही. या निवासा संदर्भात वारस कोण? याबाबत वाद होता. त्यामुळे हे निवासस्थान पालिकेच्या ताब्यातच आहे. मात्र या निवासाची स्वच्छताही सातत्याने केली जात नसल्याचे दिसून येते.

काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांनी शिक्षण मंडळ इमारतीबरोबरच या स्मृति निवासाची पाहणी केली होती. त्यानंतरही या निवासाची दुरावस्था कायम आहे. हुतात्म्यांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे सर्वांचेच कर्तव्य आहे. पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सुजाण नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नुकतेच पालिकेने शहरातील सर्व पुतळ्यांची डागडुजी करुन स्वच्छताही केली होती. परंतु हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यात पालिका अपयशी ठरत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चार हुतात्म्यांचे पुतळे असून याच परिसरात चौपाटी देखील आहे. सायंकाळी चार वाजण्याच्या नंतर चार हुतात्मा पुतळा परिसरास फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा विळखा असतो. तर हुतात्मा पुतळ्यांच्या पाठीमागेही अस्वच्छता व अडगळीचे साहित्य पडलेले असते. महापौर आणि आयुक्तांनी जातीने याप्रकरणी लक्ष घालावे, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

महापालिका प्रशासनाने संवेदनशिलता जपावी

12 जानेवारी 1930 रोजी चार स्वातंत्र्य सेनानींना फ्ढाशी देण्यात आली. या दिवसासह अनेकदा चार हुतात्मा पुतळ्यास अभिवादन केले जाते. हुतात्म्यांच्या स्मृती जागवणारा दिवस जवळ येत असल्यान तरी या स्मृती निवासाची स्वच्छता करण्याची आवश्यकता आहे. पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जाते की नाही, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Related posts: