|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सत्तरीतील माकडताप रुग्णांच्या संख्येत वाढ

सत्तरीतील माकडताप रुग्णांच्या संख्येत वाढ 

प्रतिनिधी/ वाळपई

सत्तरीतील माकडतापाचा फैलाव वाढू लागला असून वेळगे येथे दोन रुग्ण सापडल्यानंतर आज आणखीन एक रुग्ण सापडल्याने वाळपईची आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सदर गावात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत

माकडतापाची लागण होण्यासाठी सभोवताली परिसरात माकडाचा मृत्यू होण्याची गरज आहे. मात्र म्हादई अभयारण्याचे अधिकारी प्रकाश सालेलकर यांच्या माहितीनुसार आतापर्यंत या भागात कोणत्याही माकडाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.

डीएमपी तेलाच्या बाटल्याचे वितरण

येणाऱया काळात काजू उत्पादनाचा मौसम सुरु होणार असल्याने याचा प्रभाव बऱयाच प्रमाणात वाढण्याची भीती असल्याने सदर दोन्ही गावांनी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे. याचा पहिला टप्पा म्हणजे गावातील लोकांनी कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहेत. तर दुसऱया टप्प्यात रानात जाण्यापूर्वी गोचिडींचा त्रास होऊ नये म्हणून उपयुक्त ठरणाऱया डीएमपी तेलाच्या बाटल्याचे वितरण करण्यात आले आहे. दोन्ही गावातील घरोघरी सदर बाटल्या मोफतरित्या वितरित करण्यात आलेल्या आहेत.

वाळपईच्या आरोग्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन एक हजार बाटल्या मागविण्यात आलेल्या आहेत. त्या लवकरच उपलब्ध होणार आहेत. यामुळे सत्तरीतील अनेक गावात यापूर्वी माकडतापाचा प्रभाव झाला होता सदर ठिकाणी घरोघरी जाऊन याचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. सध्या सत्तरीतील जवळपास 70 टक्के पेक्षा जास्त गावांमध्ये माकडतापाचे दुष्पपिणाम नागरिकांना भोगावे लागले आहेत यात पाली, ठाणे, हिवरे, कोपार्डे, झरमे, दाबे, म्हाऊस, शेळपे, शिगणे, वेळगे, सालेली, केरी, शिरोली, सालेली, धावे, माळोली व इतर गावांचा समावेश आहे. सदर गावात याबाटल्या वितरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान आज वेळगे याठिकाणी नव्याने आढळलेल्या रुग्ण वाळपईच्या सामाजिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. त्याची रक्त तपासणी करण्यात आल्यानंतर त्यास माकडताप झाल्याचे निष्पन्न झाले व त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती यावेळी आरोग्य सुत्रांनी दिली आहे.

Related posts: