|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नारळाचे दर गोंयकारांच्या आवाक्याबाहेर

नारळाचे दर गोंयकारांच्या आवाक्याबाहेर 

40 रुपयांपर्यंत दर, कृषीखात्याकडून ठोस उपाययोजना नाही

प्रतिनिधी/ पणजी

नारळाच्या हुमणाशिवाय अन्न पोटात जात नसणाऱया गोमंतकीयांना आता नारळ खरेदी करणे कठीण बनले आहे. नारळाचे दर गोव्यात गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य माणसाला रोजच्या जेवणात नारळ वापरणे आवाक्यापलीकडे गेले आहे. अशा स्थितीत कृषी खाते मात्र गप्प आहे. मागील आठ महिन्यांच्या कालावधीत कृषी खात्याने गोयकारांच्या या गंभीर समस्येकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.

राज्यात नारळाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. साधारण आकाराचा नारळ 25 ते 30 रुपयांपर्यंत विकला जात आहे. तर मोठय़ा आकाराचा नारळ 40 ते 45 रुपयांपर्यंत विकला जात आहे. मध्यम आकाराचे नारळ 100 रुपयात तीन विकले जातात. 500 रुपये खर्च केले तर केवळ 15 नारळ घरी येतात. नारळाच्या प्रचंड वाढलेल्या दराने सर्वसामान्यांच्या नाकीदम आणला आहे, मात्र असे असले तरी राज्य सरकार याबाबत फारसे गंभीर नाही. कृषी खात्याने तर याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

राज्यात नारळाचे दर गगनाला का भिडले, त्यामागे कोणती कारणे आहेत याबाबत कृषी खात्याने ठोस असा अभ्यास केल्याचे दिसत नाही. त्याचबरोबर प्रचंड वाढलेल्या नारळाच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठीही कृषी खात्याची ठोस अशी योजना अद्याप पुढे आलेली नाही. नारळाचे उत्पादन कमी झाले, पाडेली मिळत नाही अशी थातुरमातून कारणे पुढे करून वेळ मारून नेला जात आहे. मात्र यामुळे सामान्य माणसाची मोठी अडचण झाली आहे. भाज्यांचे दरही प्रचंड वाढले आहे. प्रचंड वाढलेल्या महागाईत नारळाच्या वाढलेल्या दराने मोठी भर घातली आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे आर्थिक गणीतच कोलमडले आहे.

गोंयकारपणाच्या केवळ गप्पा

गेंयकारपण राखण्यासाठी गेंयकार माणूस समाधानी असणे आवश्यक आहे, मात्र गेंयकारासमोर अन्य समस्यासह वाढत चाललेल्या महागाईचे मोठे संकट आहे. कृषी विषयक सर्व गोष्टी या गोंयकारांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. भाजीपाला, नारळ या गोष्टी जीवनावश्यक आहे आणि नेमक्या याच वस्तू प्रचंड महागलेल्या आहेत, मात्र असे असले तरी कृषी खात्याचे कोणतेही नियंत्रण यावर राहिलेले नाही.

कृषी खात्याच्या दुर्लक्षाबाबत नाराजी

कृषी उत्पादनांचे दर गगनाला भिडत चालले असताना राज्याचे कृषी खाते मात्र निश्चिंत आहे. दरदिवशी महाग भाज्या, महाग नारळ खरेदी करताना सर्वसामान्यांची तारांबळ उडत आहे. नारळाने तर कहर केला आहे. तरीही कृषी खात्याला म्हणावी तशी जाग आलेली नाही. कृषी खात्याच्या कारभारावर सामान्य नागरिक सध्या तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.

प्रादेशिक आराखडय़ाऐवजी कृषी खात्यावर लक्ष द्यावे : चोडणकर

कृषी उत्पादनांच्या वाढलेल्या दरामुळे राज्यातील सामान्य जनता त्रस्त बनली आहे. कृषी खात्याचे याकडे लक्ष नाही. त्याचबरोबर कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी तर याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यांनी प्रादेशिक आराखडय़ावरील लक्ष काढून कृषी खात्याकडे लक्ष द्यावे असा सल्ला काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर यांनी दिला आहे. वाढत्या महागाईने गरीब जनतेची अवस्था वाईट बनली आहे. नारळाने तर कहर केला आहे. त्यामुळे नारळ गेंयकारांचे नारळाचे हुमण अडचणीत आले आहे. 40 रुपये नारळ खरेदी करणे सर्वसामान्य जनतेच्या आटोक्यापलीकडचे आहे. गेंयकारपणाची भाषा बोलणाऱया सरदेसाई यांनी कृषी खात्याकडे लक्ष द्यावे व सामान्य गोंयकारांचे हीत जपावे असेही चोडणकर म्हणाले. नारळाचे दर असेच वाढत राहिल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत नारळ सामान्यांपासून दूर जाईल. ‘गेंय, गोंयकार, गोंयकारपण’ हा मुद्दा केवळ भाषणापुरता राहू नये असेही चोडणकर यांनी म्हटले आहे. माडाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढलेल्या गोवा फॉरवर्ड व विजय सरदेसाई यांनी नारळ हा गेंयकारांच्या जीवनाचा भाग आहे, याची जाणीव ठेवावी, असा सल्लाही चोडणकर यांनी दिला आहे.

Related posts: