|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » धारगळ येथे क्रिकेट स्टेडियम होणे अशक्य

धारगळ येथे क्रिकेट स्टेडियम होणे अशक्य 

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी धारगळ येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी जागा देणार असल्याचे सांगितले असले तरी धारगळ येथे स्टेडियम होणे शक्य नाही, असा दावा गोवा क्रिकेट संघटनेचे (जीसीए) माजी सचिव शिरीष नाईक यांनी केला आहे. थिवी, म्हावळिंगे प्रमाणेच धारगळ येथेही अनेक तांत्रिक तृटी उद्भवणार असल्याने तेथे स्टेडियम होणे अशक्य आहे, असेही नाईक म्हणाले.

शनिवारी 6 रोजी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत ज्ञानेश्वर वायगंणकर, सुभाष पोळे, प्रकाश वायगंणकर उपस्थित होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काढलेल्या काळ्या यादीत गोवा क्रिकेट संघटनाही पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे बीसीसीआय कडून निधी मिळणे शक्य नाही. धारगळीतील क्रिकेट स्टेडियम म्हणजे ‘बोलाचा भात व बोलाची कढी’ असाच प्रकार होणार आहे, असे नाईक पुढे म्हणाले. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट मैदानासंदर्भात मुख्यमंत्री पर्रीकर यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा असून त्यांनी फेरविचार करावा असा सल्लाही नाईक यांनी दिला. धारगळ येथील जी जमीन देण्याबाबत आश्वासन दिले आहे ती गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या ताब्यात आहे. सदर जमीन क्रीडा नगरी उभारण्यासाठी घेण्यात आली होती. त्या जमिनी संदर्भात अजूनही काही लोकांच्या तक्रारी आहेत. तसेच जमीन ताब्यात मिळाल्या शिवाय बीसीसीआय निधी देणार नाही, अशी माहिती नाईक यांनी दिली.

या अगोदर थिवी, म्हावळिंगे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट मैदान उभारणीच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यानी अगोदर सखोल चौकशी करावी किंवा हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी नाईक यांनी केली.

थिवी येथे सुमारे 1.30 लाख चौरस मीटर जागा तेथील शेतकऱयांची घेण्यात आली होती. त्या जमिनीत सुमारे 9 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र मैदान काही झाले नाही. नंतर ही जागा वनखात्याच्या ताब्यात देण्यात आली आहे. वास्तविक ज्या शेतकऱयांकडून जमिनी बळजबरीने घेण्यात आल्या ते शेतकरी अजूनही न्यायालयात लढा देत आहेत, असे एक जमीन मालक ज्ञानेश्वर वायंगणकर यांनी सांगितले. शेतकऱयांकडून 5 रुपये चौरस मीटर दराने जमिनी घेऊन शेतकऱयांवर मोठा अन्याय करण्यात आला आहे. अद्याप त्यांना तेही पैसे मिळालेले नाहीत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱयांना न्याय द्यावा अशी मागणी वायंगणकर यांनी केली.

म्हावळिंगे येथील जमीन संपादन मोठा घोटाळा

जीसीएचे माजी अध्यक्ष शेखर साळकर यांच्या नेतृत्वाखाली म्हवळिंगे येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारण्यासाठी सुमारे 2.65 लाख चौरस मीटर जमीन संपादन करण्यात आली होती. बीसीसीआयच्या मागणी नुसार एखाद्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारावयचे असल्यास त्या परिसरात काही ठराविक साधनसुविधा असणे आवश्यक आहेत. मात्र त्या सुविधा नसतानाही जीसीएने म्हावळिंगे येथे जागा का निवडली होती हा एक प्रश्नच आहे. वास्तविक त्या जमिनीचा दर 300 रुपये चौरस मीटर असा असताना जीसीएने 2500 रुपये प्रमाणे जागा खरेदी केली होती. हा फायदा कोणाचा होता असा प्रश्न शिरीष नाईक यांनी उपस्थित केला आहे. सुमारे 45 कोटी रुपये विनाकारण खर्च करण्यात आले होते. हा एक मोठा घोटाळा असून त्याची योग्य रितीने चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नाईक यांनी केली आहे.

Related posts: