|Sunday, February 23, 2020
You are here: Home » मनोरंजन » हॉस्टेलचे आयुष्य दिसणार रुपेरी पडद्यावर

हॉस्टेलचे आयुष्य दिसणार रुपेरी पडद्यावर 

प्रख्यात लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक यांनी आत्तापर्यंत बावरे प्रेम हे, लग्न पाहावे करून आणि सतरंगी रे यांसारखे गाजलेले चित्रपट दिल्यानंतर ते आता पुन्हा एकदा हॉस्टेल डेज या आगामी चित्रपटातून रसिकांसमोर येत आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2018 रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून त्यात प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

त्याशिवाय या चित्रपटात प्रतिभावान कलाकारांचा एक अख्खा चमूच काम करत आहे. चिन्मय पटवर्धन, सागरिका रुकरी, पूर्वा देशपांडे, पूर्वा शिंदे, अंकिता लांडे आणि गणेश बिरंगल यांचा त्यात समावेश आहे. हॉस्टेलमध्ये राहणाऱया प्रत्येकाच्याच मनात हॉस्टेलमधील दिवसांची एक वेगळी अशी विशेष आठवण असते. ज्यांनी हे हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाही, त्यांना या आयुष्याबद्दल नेहमीच कुतूहल लागून राहिलेले असते. हॉस्टेलमधील त्या दिवसांबद्दल आठवण आली की कोणीही नॉस्टॅल्जिक होतोच, असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक यांनी काढले. ही कथा आहे 1994 मधील साताऱयातील कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलची. 1990 च्या या दशकात महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये फार मोठे बदल अनुभवले गेले. याच दशकात अनेक खासगी महाविद्यालये सुरू झाली. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱयातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येऊ लागले. समाजामध्ये त्यामुळे फार मोठे बदल झाले आणि महाविद्यालयांच्या वातावरणातही बदल झाले. हॉस्टेल डेजची कथा हेच बदल अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने, विनोदाच्या अंगाने आणि सकारात्मकरित्या मांडते.

1990 चे दशक हे मधुर गाण्यांसाठीही ओळखले जाते आणि त्याचमुळे या दशकाला जागणारा ‘हॉस्टेल डेज’ हा एक सांगितिक चित्रपट आहे. या चित्रपटात एकूण आठ मधुर गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलीवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारखे आघाडीचे गायक कलाकार त्यासाठी एकत्र आले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संगीतकर अजय नाईक यांना 1990 च्या दशकातील हा काळ हॉस्टेल डेजमध्ये त्याचप्रकारची गाणी देऊन पुनरुज्जीवीत करायचा होता. या सर्व गायकांनी चित्रपटासाठी गावे अशी त्यांची इच्छा होती. ‘या दिग्गजांनी जेव्हा गाणी गायला होकार दिला तेव्हा त्याचा आनंद व्यक्त करायला शब्द नव्हते. आघाडीच्या सहा बॉलीवूड गायकांनी एका मराठी चित्रपटासाठी गाण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल, असे उद्गार अजय नाईक यांनी काढले. त्यांच्याबरोबर मराठीतील आघाडीचे गायक प्रियांका बर्वे, आनंदी जोशी आणि रुचा बोंद्रे यांनीही यातील गाणी गायली आहेत.

नाईक पुढे म्हणाले की, कॉलेज जीवनावर कित्येक यशस्वी चित्रपट आले आहेत आणि जगभरात कित्येक भाषांमध्ये त्यांची निर्मिती झाली आहे. पण हॉस्टेल जीवनावर बेतलेला हा एक आगळा असा चित्रपट आहे. म्हणूनच या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठय़ा प्रमाणावर उत्सुकता लागून राहिली आहे.

Related posts: