|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विजयदादांच्या पाठीशी रहा’ ; पवारांची आगतिकता

विजयदादांच्या पाठीशी रहा’ ; पवारांची आगतिकता 

संकेत कुलकर्णी  / पंढरपूर 

‘जिह्याने विजयदादाच्या पाठीशी रहावे’ असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना नुकतेच अकलूजमध्ये केले. त्यामुळे जिह्याच्या राष्ट्रवादीच्या पडत्या राजकारणात मोहिते-पाटलांबाबत पवारांची आगतिकता दिसून आली. जिह्यात वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी पवारांना बोलविण्यात विजयसिंहाची आगतिकता होती. याबाबत मात्र सध्या राजकीय वर्तुळामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.

अकलूज येथे सहकारमहर्षीच्या जन्मशताब्दी वर्षात समारोहाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्याच्यासमवेत सुशिलकुमार शिंदे होते. तसेच जिह्यातील बहुतांश नेते उपस्थित होते. सहकारमहर्षींच्या संघटन कौशल्याचा दाखला देत, शरद पवारांना चक्क जिह्यातील राष्ट्रवादीचे संघटन वाढविण्यासाठी विजयसिंहाच्या पाठींशी सर्वांनी उभे रहावे, असे सांगितले. त्यामुळे निश्चितच विजयदादा यांच्या जिह्यातील नेतृत्वाला संकुचित सीमा आल्या की काय ? अशी कुजबूज यानिमित्ताने सुरू झाली.

मोहिते-पाटील हे राज्यातील एक मेठे राजकीय घराणे म्हणून ओळखले जाते. मात्र 2009 साली विजयसिंहाचा विधानसभेला पराभव झाला. त्यांचा जिह्यातील बोलबाला हळूहळू कमी झाला. अशातच राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीच्या मूक संमतीवरून त्यांच्या विरूध्द एक गट सक्रीय होऊ लागला. आज तोच शिंदे-परिचारक गट भाजपाशी जवळीक साधून आहे. सुमारे वर्षभरापूर्वी मोहिते-पाटलांनी भाजपाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या संस्था अडचणीत असल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारला गेल्याची काही महिन्यापूर्वी चर्चा होती. त्यामुळे मोहिते-पाटलांना राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही.

यामध्येच मोहिते-पाटलांची तिसरी पिढी 2017 मध्ये झेडपीमध्ये जाताच, संख्याबळ असून देखील राष्ट्रवादीला पर्यायाने मोहिते-पाटील घराण्याला पराभवाची नामुष्की आली. यातच सुमित्रा पतसंस्था अडचणीत आली. विजय शुगरच्या लिलावाची वेळ आली. म्हणूनच की काय जनतेमध्ये विश्वास अबाधित ठेवण्यासाठी चक्क राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना आपण विजयदादाच्या पाठीशी उभे रहावे, असे जाहीर सांगावे लागले. त्यामुळे निश्चितच सोलापूर जिह्याबाबत पवारांना विजयसिंहाशिवाय पर्याय नसल्याची आगतिकता दिसून आली.

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीची होणारी पिछेहाट आणि भाजपाचा पश्चिम महाराष्ट्रातील वाढता प्रभाव याचा विचार करता, पवारांनी विजयसिंहांच्या मागे ताकद देण्याचे आवाहन सुशीलकुमारांसह इतर नेत्यांना केले, मात्र त्यामुळे त्यांची अन् पर्यायाने राष्ट्रवादीची होणारी पिछेहाट अधोरेशित होत असल्याचे बोलले जाते आहे. पुढील काळात नवीन राजकीय समीकरणात विजयदादांच्या ताकदीसाठी पवारांनी प्रयत्न केले तर जिह्याचे राजकारण निश्चितच वेगळे असेल यात शंका नाही.