|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बालिका खुनप्रकरणी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

बालिका खुनप्रकरणी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा 

प्रतिनिधी/ आटपाडी

आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथील कु. प्रतीक्षा दादासाहेब गळवे या आठ वर्षीय बालिकेच्या खुनप्रकरणी सूत्रधाराला तात्काळ अटक करण्याची मागणी करत आटपाडी पोलीस ठाण्यावर बुधवारी मोर्चा काढत ठिय्या मारण्यात आला. चिमुकल्या प्रतिक्षाच्या रक्षाविसर्जनानंतर नातेवाईकांसह राजकीय नेते, पदाधिकारी व विविध मंडळींनी मोर्चात सहभागी होती दोषींना तात्काळ करावी अन्यथा 16 जानेवारीपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

गळवेवाडी येथील कु. प्रतीक्षा गळवे या बालिकेचा खून करून तो मृतदेह एका पडक्या विहिरीत टाकण्यात आला होता. नातेवाईकांनी बेपत्ता झालेल्या बालिकेचा शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह एका पडक्या विहिरीत सोमवारी आढळला. या प्रकरणी अज्ञातावर अपहरण व खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर मुलीचे बुधवारी रक्षाविसर्जन होते. रक्षाविसर्जनासाठी समस्त लोणारी समाजबांधव, नातेवाईक, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

रक्षाविसर्जनावेळी अनेकांनी बालिकेच्या हत्येचा उलगडा न झाल्याने संतप्त भावना व्यक्त करत थेट आटपाडी पोलिसाला धडक देण्याचा निर्णय घेतला. आटपाडी पोलीस स्टेशन चौकातून समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, पंढरपूरपचे नगरसेवक नवनाथ रानगड, डॉ. सुदर्शन घेरडे, महादेव बाड, दैवत काळेल, दत्तात्रय आटपाडकर, पोपट आटपाडकर, प्रकाश कुदळे, उमाजी ढेंबरे, दिनकर करांडे, बाळासाहेब पाटील, शरदचंद्र काळेल, बापू काळेल, श्रावण खांडेकर, विठ्ठल बाड, मोहन खरात, मयूर गळवे यांच्यासह मोठय़ा संख्येने लोणारी समाज बांधवांनी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला.

पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारून सदर घटनेबाबत मनोगते व्यक्त करत उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी सदर माणुसकीला काळीमा फासणाऱया घटनेचा निषेध करत पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी व सहकारी आरोपीला तात्काळ अटक करतील, असा आशावाद व्यक्त केला. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांनाही भेटून बालिकेचा खून करणाऱयाच्या तपासासाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सुदर्शन घेरडे, दैवत काळेल आदींनी बालिकेवर अत्याचार करून खून प्रकरणातील दोषीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली. कोपर्डी, खैरलांजी, जुजारपुरसह अनेक ठिकाणी अशा घटना घडताहेत. ही बाब लाजिरवाणी असून आरोपींना अटक न झाल्यास 16 तारखेपासून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात  आला. मोहन खरात यांनी गळवेवाडीतील घटनेचा निषेध करत ही बालिका विशिष्ट समाजाची नसून ती सर्वांची असल्याचे सांगत तपासासाठी प्रसंगी तालुका बंद ठेवण्याचा इशारा दिला.

पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी लोणारी समाज सेवा संघ व मृत बालिकेच्या वडिलांचे निवेदन स्वीकारून याप्रकरणी पोलिसांनी युध्दपातळीवर तपास यंत्रणा राबविल्याचे सांगितले. ती बालिका संपूर्ण समाजाची असून या घटनेमुळे पोलीसांचेही मन हेलावले आहे. गळवेवाडीतील ग्रामस्थांनी व समाजातील सर्व घटकांनी याप्रकरणी तपासात पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. घटनेबाबतची कोणतीही माहिती असल्यास मला नाव गुप्त ठेवून माहिती द्या. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने गळवेवाडीतील बालिकेची हत्या करणाऱया आरोपींना अटक करेन. आमच्यावर विश्वास ठेवून सहकार्य करा, असे आवाहनही पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी केले.

नायब तहसीलदार बाळासाहेब सौवदी यांनीही गळवेवाडीकरांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याची ग्वाही देत पोलीस लवकरच आरोपींचा छडा लावतील,  असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर पोलीस ठाण्यासमोरील ठिय्या उठला. दरम्यान,  अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनीही भेट देवून याप्रकरणी तपासाची माहिती घेत पोलिसांना सूचना केल्या.

Related posts: