|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शाळा बंदचा निर्णय शिक्षण कायद्याप्रमाणेच

शाळा बंदचा निर्णय शिक्षण कायद्याप्रमाणेच 

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा

1300 शाळा बंद करण्याचा प्रस्ताव

शिक्षणाची वारीला प्रारंभ, शैक्षणिक विचारांची होणार देवाण-घेवाण

प्रतिनिधी /रत्नागिरी

राज्यात 1300 शाळा बंद करून शिक्षकांसह विद्यार्थी शेजारच्या शाळेत हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आह़े शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहूनच हा निर्णय घेण्यात आला आह़े प्राथमिक शिक्षण 1 क़ि म़ी अंतरावर आणि उच्च प्राथमिक 3 क़ि म़ी अंतरावर उपलब्ध असाव़े या तरतुदींना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आह़े, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केल़े

येथील एम. डी. नाईक सभागृहाच्या मैदानात 11 ते 13 जानेवारीपर्यंत ‘शिक्षणाची वारी’ या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ गुरूवारी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी शिक्षण विद्या प्राधिकरण संचालक सुनील मगर, जि. प. अध्यक्षा स्नेहा सावंत, उपसंचालक मकरंद गोंधळी, गंगाधर म्हमाणे, सुनील चौहान, दिनकर पाटील, शिक्षण सभापती दीपक नागले, नगराध्यक्ष राहुल पंडित, डाएटचे प्रा.डॉ.आय. शी. शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिरगांव सरपंच वैशाली गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

1300 शाळा बंद करण्याचा आपला निर्णय अतिशय योग्य आहे. ज्या ठिकाणी 10 च्या आत पटसंख्या होती, त्या मुलांचा सर्वांगिण विकास होत नव्हता. तसेच शिक्षकांनाही या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम राबवताना काही अडचणी येत होत्या. या सगळय़ा गोष्टींचा अभ्यासपूर्ण विचार करून या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आले. या कमी संख्या असलेल्या शाळेतील मुलांचे नुकसानच होत होते. या मुलांना इतर शाळांमध्ये वर्ग केल्याने त्यांचा आता चांगल्या अर्थाने विकास होत असल्याचेही यावेळी विनोद तावडे यांनी सांगितले. शिक्षण हक्क कायद्याच्या बाहेर जाऊन एकही शाळा बंद होणार नाह़ी प्राथमिक शिक्षण 1 क़ि म़ी आणि 3 क़ि म़ी वर उच्च प्राथमिक शिक्षण देण्याची हमी कायम राहिल़ शासकीय धोरणात चूक असेल तर आम्ही अशी शाळा बंद करणार नाह़ी संबंधितांनी तसे लक्षात आणून द्याव़े, असे आवाहन तावडे यांनी केल़े

अल्पावधीतच राज्यातील 61 हजार शाळा डिजिटल

बदलत्या काळानुसार मुलांना प्रभावीपणे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑनलाईन पध्दतीचा वापर अधिकाधिक कसा होईल, या दृष्टीने शिक्षण खाते प्रयत्न करीत आहे. मुलांना अभ्यासक्रमाचा ताणतणाव वाटू नये, यासाठी त्यांच्या कलेनुसार त्यांना आवडेल, अशा पध्दतीने डिजिटल शाळा संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. अल्पावधीतच राज्यातील 61 हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. यासाठी आपल्या सर्व शिक्षकवर्गांनी मेहनत घेतली. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी होत असल्याचेही विनोद तावडे यांनी सांगितले.

काही समजून न घेताच उगाच टीका करू नये

आपण आता कंपनी शाळांना परवानगी देत आहोत. या संकल्पनेला काही लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र कंपनी शाळा म्हणजे काय, याबद्दल हे विरोध करणारे लोक काही सांगू शकत नाहीत. कंपनी शाळा म्हणजे कंपनीच्या कायद्याखाली ना नफा ना तोटा या तत्वावर कंपनी काढू शकता. अशी तरतूद आह़े त्याचा वापर करून शाळा काढण्याला परवानगी देण्याचा प्रस्ताव आह़े हा अतिशय चांगला प्रस्ताव असल्याचेही यावेळी विनोद तावडे यांनी सांगितले. एखादी नवीन घोषणा जेव्हा आपण करतो, तेव्हा नेमका काय उपक्रम आहे हे लोकांनी समजून घ्यावे. काही समजून न घेताच उगाच टीका करू नये, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षकांना शाळाबाहय़ काम पूर्वीही होती. आता ही आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आपण शिक्षणमंत्री झाल्याने काम वाढले असे नाही. तरीदेखील आपल्या शिक्षकांना शाळाबाहय़ काम लागू नये, यासाठी अधिकाधिक वेळ शाळेमध्ये राहू द्या. यासाठी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव मांडलेला आहे. मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जि. प. शाळांच्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला. त्यामुळे यामधील भ्रष्टाचाराला वाव उरला नाही. गुणवत्तेप्रमाणे बदल्यांची यादी जाहीर करण्यात येते. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नसल्याचेही तावडे यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्हय़ात शिक्षणाची वारी घेण्याचा मानस

रत्नागिरी शिक्षणाची वारीव्दारे शिक्षकांमधील ज्ञानाची देवाण-घेवाण होत आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या गुणवत्तेला वाव देण्यासाठी ही वारी भरवण्यात आली आहे. या शिक्षणाची वारी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावी, यासाठी प्रत्येक जिल्हय़ात शिक्षणाची वारी उपक्रम घेण्याचा आपला मानस आहे. या ठिकाणी असलेल्या सर्व स्टॉलमधील प्रोजेक्ट अतिशय कौतुकास्पद असल्याचेही उद्गार यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण संचालक सुनील मगर यांनी केले. शिक्षकांनी आणि विद्यार्थी शैक्षणिक केलेले सर्वोत्तम प्रयोग इतरांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने ही वारी भरवण्यात आल्याचे मगर यांनी सांगितले. या कार्यक्रमावेळी शैक्षणिक स्टॉलचे उद्घाटनही तावडे यांच्याहस्ते करण्यात आले. वारीचा उद्घाटन सोहळा दीपप्रज्वललाने पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने शिक्षकवर्ग उपस्थित होता.

महाराष्ट्र प्रगत

शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र 16 व्या स्थानावर होत़ा तो आता तिसऱया स्थानावर आला आहे. यावरूनच आपण शिक्षण क्षेत्रात केलेली कामगिरी दिसून येते, असे स्पष्ट मत राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. राज्यात 1 लाख 11 हजार शाळा आहेत. यापैकी तब्बल 61 हजार शाळा डिजिटल करण्याचा शिक्षण खात्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत अतिशय मोलाची ठरली आहे.

Related posts: