|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » युथ फिल्म फेस्टिव्हलमध्ये 24 लघुपट दाखविणार

युथ फिल्म फेस्टिव्हलमध्ये 24 लघुपट दाखविणार 

18-19 रोजी डॉन बॉस्को स्कूलमध्ये आयोजन

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

ओरोस येथील डॉन बॉस्को स्कूलमध्ये 18 व 19 जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील युथ फिल्म फेस्टिव्हलची तयारी झाली असून या दोन दिवसात 34 लघुपट दाखविले जाणार आहेत. फेस्टिव्हलसाठी टाईमपास चित्रपटातील कलाकार नयन जाधव, दृश्यम चित्रपटातील कलाकार अभय खडपकर, मालवणी कवी दादा मडकईकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉन बॉस्को स्कूलचे मुख्याध्यापक क्लाईव्ह टेलेस व ऍडमिनिस्ट्रेटर फादर ज्योकीम लोबो यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी फिल्म प्रोडय़ुसर साईनाथ जळवी, प्रा. रोहीदास राणे, फ्रान्सीस फर्नांडिस श्रद्धा तावडे, आयडा भुतेलो, बेनिता मान्येकर उपस्थित होते.

डॉन बॉस्को स्कूलमध्ये ओरोस येथे गतवर्षी प्रथमच युथ फिल्म फेस्टिव्हल घेण्यात आला. त्याची यशस्विता लक्षात घेऊन पुन्हा एकदा युथ फिल्म फेस्टिव्हल ओरोस येथे आयोजित करण्याचे यजमानपद डॉन बॉस्को स्कूलला मिळाले आहे. 18 व 19 जानेवारीला सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लघुपट दाखविले जाणार आहेत. एकंदर 900 लघुचित्रपटांची नोंदणी झालेली होती. त्यापैकी 20 देशांमधील निवडक 34 लघुचित्रपट निवडण्यात आले आहेत. ते दाखविले जाणार आहेत. त्याशिवाय सिंधुदुर्ग जिल्हय़ातील स्थानिक युवकांनी जर लघुपट केलेले असतील तर त्यांनाही लघुपट दाखविण्याची संधी दिली जाणार आहे.

लघुपटाच्या माध्यमातून युवा वर्गासाठीचे वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्थानिक कलाकारांनी जर असे लघुपट केले असतील तर त्यांना या फेस्टिव्हलमध्ये संधी दिली जाणार आहे. फिल्म फेस्टिव्हलमुळे युवा वर्गाला फिल्म बनविण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात, चित्रपटात काम करायचे असेल तर कसे काम करावे लागते, याची माहिती मिळते. त्यामुळे फेस्टिव्हललाही युवावर्ग प्रतिसाद देतील, असा विश्वास जळवी यांनी व्यक्त केला.