|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विलासपुरमध्ये साकारणार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

विलासपुरमध्ये साकारणार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प 

प्रतिनिधी/ सातारा

शहरालगत असलेल्या विलासपूर ग्रामपंचायतीची लोकसंख्या साडेपाच हजारच्या आसपास आहे. या ग्रामपंचायतीला कचरा टाकण्यासाठी सातारा पालिकेच्याच सोनगाव कचरा डेपोचा आधार घ्यावा लागतो. परंतु आता ग्रामस्थांनी एकीची वज्रमुठ आवळत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जागेत घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प साकारण्याचा चंग बांधला आहे. येत्या काही दिवसात प्रकल्प उभारुन त्यातून होणाऱया खतनिर्मितीचे उत्पन्नही ग्रामपंचायतीला मिळणार आहे. त्या दृष्टीने सध्या आमदार शिवेंद्रराजे भोसले, कर्तव्य सोशल ग्रुपच्या वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार विलासपुरमध्ये कामकाज सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा प्रश्न सुटणार आहे.

विलासपूर ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून कचरा टाकण्यासाठी पालिकेच्याच सोनगाव कचरा डेपोवर अवलंबून राहवे लागले आहे. सातारा शहरालगतची ही ग्रामपंचायत असल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केले आहेत. जिल्हा परिषदेने घनकचरा व्यवस्थापनाचे सूत्र समजावून सांगितल्यानंतर पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण यांनी कसल्याही परिस्थितीत विलासपूरचा हा प्रश्न सोडविण्याचा संकल्प छेडला. त्यानुसार त्यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या कारभाऱयांना विश्वासात घेतले. एकीची वज्रमुठ आवळत सर्वांनीच कचऱयाची जटील समस्या कशी सोडवता येईल यावर चर्चा घडवून आणली. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोकळय़ा शासनाच्या जागा शोधल्या. त्यामध्ये घनकचरा प्रकल्प साकारण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्याच अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे. येत्या काही दिवसात प्रकल्प उभा राहिल आणि कचऱयाचा प्रश्न सुटेल, अशी आशा विलासपूर ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

Related posts: