|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दोन वर्षांत गोवा प्लास्टिक, कचरा व प्रदूषणमुक्त करण्याचे उद्दिष्ट

दोन वर्षांत गोवा प्लास्टिक, कचरा व प्रदूषणमुक्त करण्याचे उद्दिष्ट 

प्रतिनिधी / मडगाव

आगामी दोन वर्षांत म्हणजे 2019 पर्यंत गोवा राज्याला प्लास्टिक, कचरा, उघडय़ावर नैसर्गिक विधी व पर्यावरणाला ग्रासणारे प्रदूषण यापासून मुक्त करण्याचे आपल्या सरकारने उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी दिली. मडगावच्या उत्तर दिशेची मुख्य भू-गटार वाहिनी बदलण्याच्या कामास प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

1984 च्या सुमारास उभारण्यात आलेली आर्लें ते सारवडे येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पादरम्यानची भू-गटार वाहिनी जीर्ण बनल्याने तिला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे सांडपाणी शेतजमिनीत शिरून पीक नष्ट होण्याचे तसेच विहिरी व अन्य जलस्त्रोत दूषित होण्याचे प्रकार घडलेले आहेत. आता 77.53 कोटी खर्चून ती बदलण्यात येत असून नवीन वाहिनी पूर्वीच्या वाहिनीला समांतर नेली जाणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी जुन्या वाहिनीला नवीन वाहिनीची जोड दिली जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

सरकारने सांडपाणी, कचरा, उघडय़ावर नैसर्गिक विधी, प्लास्टिक व पर्यावरणातील प्रदूषण या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देताना त्याविषयक समस्यांचा बिमोड करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यांना चांगले यशही मिळत आहे, असे पर्रीकर यांनी सांगितले. यासाठी जनतेने देखील सकारात्मकता दाखविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राज्यात मोठय़ा प्रमाणात कचरा गोळा होत असून साळगाव येथील कचरा प्रकल्पात चांगल्या प्रकारे प्रक्रिया होत आहे. दक्षिण गोव्यासाठी वेर्णा येथे अशाच प्रकारचा प्रकल्प उभारण्यासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भू-गटारावर भर

जलसस्त्रोत दूषित होण्यापासून रोखण्याच्या बाबतीत सांडपाणी प्रकल्प कामी येणार आहेत. त्यासाठी शहरी व अन्य भागांमध्ये भू-गटार वाहिन्या टाकण्यावर सरकारने भर दिला आहे. याअंतर्गत मडगाव व पणजीत प्रत्येकी 300 कोटींहून अधिक खर्चाची कामे पूर्ण झाली आहेत. याखेरीज नावेली, कोलवा, पर्वरी, कळंगूट, फोंडा, सांकवाळ, वास्को, कांदोळी येथे भू-गटाराची कामे चालू आहेत, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली.

कापडी पिशव्यांची सवय करा

प्लास्टिक बंदी लागू केली जाणार असून लोकांनी कापडी पिशव्या वापरण्याची सवय घालून घ्यावी. लवकरच अशा पिशव्या मोठय़ा प्रमाणात उपलब्ध केल्या जाणार आहेत. प्लास्टिक बंदीचे उद्दिष्ट गाठणे सहज शक्य होणार नसून त्यासाठी जनतेचे तेवढेच सहकार्य अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अतिरिक्त निधी पुरविण्याचे आश्वासन

सध्या उत्तरेकडील मुख्य भू-गटार वाहिनीला गळती लागल्याने नवीन वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असले, तरी आर्लें ते जिल्हाधिकारी कार्यालय वाहिनीला जास्त गळती लागलेली आहे. त्याचे काम या 77 कोटींच्या कामात समाविष्ट नाही, असे या सोहळय़ास उपस्थित असलेले नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी आपल्या भाषणातून नजरेस आणून दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्या वाहिनीसाठी अतिरिक्त 50 कोटींचा निधी लागणार असून त्याची तरतूद आपण करणार असल्याचे आश्वासन दिले.

एक उद्दिष्ट पूर्ण : सरदेसाई

मंत्री सरदेसाई यांनी शुक्रवारी सुरू झालेले काम मार्गी लावण्याची आपण पूर्वीपासून मागणी करत आलो असून प्रसंगी रस्त्यावरही उतरलेलो आहे याची आठग्नवण करून दिली. आपण मंत्री झाल्यावर मात्र एका वर्षातच हे काम हाती घेण्यात आले. हे सरकार सत्तेवर आणण्यामागे जी उद्दिष्टे आपण ठेवली होती त्यापैकी हे एक काम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आणि मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी या कामावरून आपली व मंत्री सरदेसाई यांची मंत्रिमंडळ बैठकीत बाचाबाची झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, याकडे लक्ष वेधले. बाचाबाची सकारात्मक बाबींसाठी असेल, तर आपण अशा गोष्टीचे स्वागत करतो. त्यावेळी आर्थिक मंजुरी नसल्याने काम हाती घेणे शक्य नव्हते. मुख्यमंत्र्यांनी सदर मंजुरी दिल्यावर हे काम त्वरित हाती घेतले गेले, असे ढवळीकर यांनी सांगितले.

जोडण्या त्वरित घ्याव्यात : ढवळीकर

भू-गटार ही आवश्यकता असून त्यामुळे पाण्याचे स्रोत दूषित होण्यापासून वाचविणे शक्य होते. सदर क्राँक्रिटची भू-गटार वाहिनी 1984 मध्ये मार्गी लावण्यासाठी मडगावचे तत्कालीन आमदार बाबू नायक यांनी केलेल्या प्रयत्नांना दाद देण्याची गरजही ढवळीकर यांनी व्यक्त केली. सध्या भू-गटार वाहिन्या टाकल्या जात असल्या, तरी जोडण्या घेण्याच्या बाबतीत लोकांचा प्रतिसाद तेवढा समाधनकारक नाही. त्यामुळे जनतेने आता यासाठी पुढाकार घेऊन त्वरित जोडण्या घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी ही उत्तर दिशेकडील भू-गटार वाहिनी बदलणे काळाची गरज होती, असे सांगितले. त्यासाठी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकामखाते व नगरनियोजनमंत्र्यांनी सर्व बाबींचा पाठपुरावा करून त्यातून काम हाती घेतल्याबद्दल त्यांचे कामत यांनी आभार मानले.

 

(खालील मजकूर चौकटीत घ्यावा)

जिल्हा इस्पितळाचे काम मेपर्यंत पूर्णत्वास

दक्षिण गोव्यातील जनतेने विकासकामांसंदर्भात कोणतीही शंका बाळगण्याची गरज नसून या जिल्हय़ाकडे सरकारचे पूर्ण लक्ष राहील, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिले. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम शेवटच्या टप्प्यात असून मेपर्यंत ते पूर्ण होईल आणि पावसाळा संपेपर्यंत हॉस्पिसियोचा कारभार तेथे हलविण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

पश्चिम बगलमार्ग नावेलीमार्गे जात असून तेथील जागेत पाणी साचून पूर येण्याची शक्यता स्थानिक व्यक्त करत आहते. आमदार चर्चिल आलेमाव व लुईझिन फालेरो यांना घेऊन नुकतीच या भागाची आपण पाहणी केली. नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई त्यावेळी उपस्थित होते. लोकांना आपण कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. रस्त्याच्या मधोमध पाणी जाण्यासाठी आवश्यक सोय ठेवली जाणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी साकवही येणार आहेत. मात्र तेथील साळ नदीत गाळ तसेच झाडेझुडुपे असल्याने पाणी या नदीला जाऊन मिळत नाही व पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे साळ नदीतील गाळ उपसून त्यावरही उपाययोजना केली जाणार, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली.