|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » …तर तुझाही अनिकेत कोथळे करू

…तर तुझाही अनिकेत कोथळे करू 

प्रतिनिधी/ सातारा

मेढा पोलीस स्टेशनमधील पोलिसांना दत्तात्रय भिकू पवार (रा. नेवेकरवाडी ता.जावली) यांना 31 डिसेंबरला अमानुष मारहाण केली होती. तसेच वाच्यता केलीस तर तुझा अनिकेत कोथळे करू अन् दगड बांधून महू हातगेघर धरणात  टाकू, अशी धमकी देणाऱया मेढा पोलिसांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी जावली तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत तरडे यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली. दोषी अधिकाऱयांची चौकशी करुन त्यांचे निलंबन न केल्यास प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जावली तालुका शिवसेना आणि रणरागिणी, सर्वसामान्य जनतेसह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

  पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना शिवसेनेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 31 डिसेंबर रोजी नेवेकरवाडी (ता. जावली) येथील गरीब कुटुंबातील दत्तात्रय भिकू पवार यांना मेढा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, ड्रायव्हर वाघ व घनवटे यांनी प्रतापगड साखर कारखान्यासमोरील टेलरिंगच्या दुकानातून दारू विक्री करतो, असा खोटा आरोप करुन कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये नेऊन कपडे काढून अमानुष माराहण केली. स्वतःजवळील दारूच्या बाटल्या दाखवून दत्तात्रय पवार यांनीच बाटल्या आणल्या, असा खोटा आरोप करुन मेढा पोलीस स्टेशनमध्ये कोऱया कागदावर सहय़ा घेतल्या. तसेच त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये व मोबाईलही काढून घेतला. श्री. वाघ व श्री. घनवटे यांनी जर सदर प्रकाराची कोणाकडे वाच्यता केली तर तुझा अनिकेत कोथळे करू, तसेच तुला महू- हातगेघर धरणामध्ये दगड बांधून बुडवून मारु, अशी धमकी दिली, असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे. हा प्रकार चालू असताना कुडाळाचे सहाय्यक फौजदार राजेंद्र कदम तसेच त्यांचे सहकारी यांनी मारहाण करणाऱया पोलिसांना विचारले असताना त्यांनाच उलट शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार कुडाळ पोलीस स्टेशनला नागरिकांनी दिलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हे कॅमेरे एपीआय जीवन माने यांनी काढून नेले आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

  सद्य परिस्थितीमध्ये कुडाळ परिसरातील दारुविक्रीचा महापूर राजरोसपणे सुरु आहे. तसेच मेढा पोलिसांच्या आशीर्वादाने दारुविक्री धंदे व मटका धंदा सुरु आहेत. नुकतेच व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी मेढा परिसरात मोठा दारुचा अड्डा पकडून दिला. त्याचे क्रेडीटसुध्दा माने यांनीच घेतले. साधी घरगुती भांडणे आली तरी ती मिटवण्याऐवजी विकोपाला कशी जातील याकडे मेढा पोलीस स्टेशनचे अधिकाऱयांचे लक्ष असते. यामुळे जनतेचा पोलिसांवर विश्वास कमी होत आहे. या प्रकरणाची सखोलपणे व निःपक्षपातीपणे, जबाबदार व अनुभवी पोलीस अधिकाऱयांमार्फत चौकशी होऊन दोषी अधिकाऱयांवर भा.द.वि. कलम 307, 363, 392, 324, 504, 506 व 34 अन्वये गुन्हे नोंद करुन निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि दत्तात्रय पवार यांना न्याय द्यावा, अशी  मागणी शिवसेनेतर्फे केली आहे.

  या प्रकरणाची चौकशी होऊन आठ दिवसात कारवाई न झाल्यास जावली तालुक्यातील रणरागिनी व सर्वसामान्य जनतेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. त्यामुळे निर्माण होणाऱया कायदा व सुव्यवस्थेस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिल, असा इशाराही देण्यात आला आहे.

  निवेदन देताना शिवसेना जावली तालुकाप्रमुख प्रशांत तरडे, महिला संघटक जयश्री पवार, वासंती पाडळे, संजय शेवते, शिवाजी जाधव, विकास वाघ, दत्तात्रय दरेकर, युवराज तरडे, उमेश पवार उपस्थित होते.

Related posts: