|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावर 12 लाखांचे सोने जप्त कस्टम विभागाची कारवाई

दाबोळी विमानतळावर 12 लाखांचे सोने जप्त कस्टम विभागाची कारवाई 

प्रतिनिधी/ वास्को

दाबोळी विमानतळावर एका हवाई प्रवाशाकडून 12 लाख 36 हजार रूपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. 462 ग्रॅम वजनाचे हे सोने सदर प्रवाशाने आपल्या शरीरात लपवून आणले होते. कस्टम विभागाच्या दाबोळी विमानतळावरील पथकाने सोमवारी सकाळी ही कारवाई केली.

आपल्या नियमित गस्तीवरील या अधिकाऱयांना एका हवाई प्रवाशाबद्दल संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली. हा प्रवासी एअर इंडियाच्या विमानाने दाबोळीत सकाळी उतरला होता. त्याच्या करण्यात आलेल्या चौकशीत कस्टम अधिकाऱयांचा संशय खरा ठरला. सदर हवाई प्रवाशाने आपण शरारात लपवून तस्करीचे सोने आणल्याची कबुली अधिकाऱयांकडे दिली. त्यानंतर हे 462 ग्रॅम वजनाचे व 12 लाख 36 हजार व 658 रूपये किमतीचे सोने अधिकाऱयांनी जप्त केले. जप्त करण्यात आलेले तस्करीचे सोने सदर प्रवाशाने आपल्या अंतर्वस्त्रात लपवले होते. एका सोन्याच्या बिस्किटच्या आठ तुकडय़ांच्या स्वरूपात हे सोने होते.

ही कारवाई गोवा कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त जी.बी. सांतामानो यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टमच्या पथकाने केली. गोवा कस्टम विभागाचे आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली या तस्करी प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.