|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तब्बल 22 तासानंतर मृतदेह घेतला ताब्यात

तब्बल 22 तासानंतर मृतदेह घेतला ताब्यात 

प्रतिनिधी/ सोलापूर

देगाव रोड येथील सीएनएस हॉस्पिटलमध्ये मिळालेली वागणूक आणि सिव्हील हॉस्पिटलमध्ये जीवंत रूग्णालाच मृत घोषित केल्याच्या प्रकारामुळे संतप्त नातेवाईकांनी तब्बल 22 तासानंतर संतोष बन्सीलाल हजारीवाले यांचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांनी दिलेल्या आश्वासनानंतर प्रकरण शांत झाले. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष हजारीवाले हे झाडावरुन पडल्यानंतर त्यांना उपचारासाठी प्रथम काटीकर डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल केले होते. तेथून पुढील उपचारासाठी डॉ. कासेगावकर यांच्या सीएनएस रूग्णालयात दाखल केले. सीएनएसच्या डॉक्टरांनी तडकाफडकी काल सोमवारी सिव्हील हॉस्पिटलला पाठविले. याबाबत नातेवाईकांना कोणतीही पूर्व कल्पना दिलीच नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला. सिव्हीलचे डॉ. बालाजी भोसले यांनी रूग्ण जीवंत असताना मृत घोषित केले होते. त्यानंतर नातेवाईकांनी जीवंत असल्याचे सांगितल्यानंतर उपचारासाठी दाखल करुन घेतले. त्यानंतर तासाभराच्या उपचारानंतर दुपारी तीन वाजता रूग्णाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान जोपर्यंत सीएनएसचे डॉक्टर आणि सिव्हीलचे डॉ. बालाजी भोसले यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला होता. आज सकाळी नातेवाईकांच्या समाजातील तब्बल 200 ते 250 लोक सिव्हीलमध्ये दाखल झाले होते. नातेवाईक सदर घटनेचे निवेदन घेवून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे गेले. तेथे न्याय मिळवून देण्याची विनंती केली. पालकमंत्र्यांनी याबाबत पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्याकडे घटनेची चौकशी करण्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, विजापूर नाक्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, फौजदार चावडीचे पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास काळे आदी पोलीस अधिकारी सिव्हील हॉस्पिटलला भेट दिले.

याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. तुम्ही मृतदेह ताब्यात घ्या. या प्रकरणी योग्य ती कारवाई करु, असे आश्वासन पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांनी नातेवाईकांना दिले. त्यानंतर संतोष हजारीवाले यांचा मृतदेह ताब्यात घेण्याचे घोषित केले. तब्बल 22 तासानंतर मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार केले.

चौकशीअंती योग्य ती कारवाई करु

जखमी अवस्थेत संतोष हजारीवाले यांना सिव्हीलमध्ये आणले होते. येथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. परंतु सदर घटनेची संपूर्ण चौकशी करुन अहवाल तयार करण्यात येणार आहे. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकीत्सकाशी बोलणे झाले आहे. ते घटनेची पूर्ण माहिती घेवून अहवाल पाठवतील. त्यावरुनच डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला होता का? असे समजेल. योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

Related posts: