|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुलीसोबत लग्नास विरोध केल्याने केला वृद्धेचा खून

मुलीसोबत लग्नास विरोध केल्याने केला वृद्धेचा खून 

कुपवाड / वार्ताहर

मुलीसोबत लग्न करण्यास विरोध केल्याने आणि प्रेमात अडसर ठरु लागल्याने चिडून एकाने डोक्यात हत्याराने मारहाण करुन मुलीची आई श्रीमती इंदुबाई शिवाजी माने (52, रा. उल्हासनगर, कुपवाड) या वृद्धेचा खून केल्याची घटना बुधवारी पोलीस चौकशीत समोर आली. खून करुन मृतदेह दोन दिवस खोलीत ठेवुन तिसऱया दिवशी साथीदाराच्या मदतीने पोत्यात बांधून पत्र्याच्या शेडमध्ये टाकल्याची कबुली संशयितांनी दिल्याची माहिती कुपवाड पोलिसांनी दिली.

 वृद्धेचा खुन करुन पसार झालेले संशयित मुख्य सुत्रधार संतोष लहु गवस (20, रा. उल्हासनगर, कुपवाड) व त्याचा साथीदार उमेश आण्णाप्पा कुल्लोळी (19, रा. शंभरफुटी रोड, सांगली) या दोघांना बुधवारी दुपारी कुपवाड पोलिसांच्या डीबी पथकाने सातारा जिल्हयातील उरमोडी धरणाजवळ पकडून गजाआड केले. त्यांना गुरुवारी मिरज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जानेवारी रोजी मृत श्रीमती इंदुबाई माने या वृद्धेचा मृतदेह शिवाजी कोष्टी यांच्या नव्या बांधकामाशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेहाचा हात कुत्र्यांनी पळवुन रस्त्याकडेला टाकल्याने खुन झाल्याची घटना उघडकीस आली. संशयितांच्या चौकशीत मृत इंदुबाई माने तिच्या मुलीसोबत उल्हासनगरमधील एका खोलीत राहत होती. त्य़ांच्या शेजारीच संशयित संतोष गवस राहत होता. संतोष व त्याचा साथीदार उमेश कुल्लोळी हे दोघे सेंट्रींगचा व्यवसाय करत होते. संतोष सहा महिन्यापासून वृद्धेच्या बालविवाह झालेल्या एका मुलीवर प्रेम करत होता. त्या मुलीसोबत तो लवकरच लग्न करणार होता. परंतु, याला मुलीची आई विरोध दर्शवुन अडथळे आणत होती. प्रेमात अडसर आणि लग्नास विरोध केल्याने संतोष वृद्ध इंदुबाईवर चिडून होता.

सहा जानेवारी रोजी इंदुबाईची मुलगी कामाला गेली असता सायंकाळी चारच्या सुमारास संतोषने वृद्धेला काम असल्याचे सांगून खोलीत बोलावुन घेतले आणि हत्त्याराने जबर मारहाण करुन ठार केले. मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर संतोषने वृद्धेचा मृतदेह पोत्यात बांधुन दोन दिवस खोलीत झाकून ठेवला होता. याबाबत त्याने मुलीला सांगितले नव्हते. आई गायब झाल्याने याबाबत मुलीने सात जानेवारी रोजी कुपवाड पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी शोध घेतला. पण पत्ता लागला नाही.

नऊ जानेवारी रोजी रात्री संतोषने साथीदार उमेशला बोलावुन घेतले आणि पोत्यात बांधलेला मृतदेह डोक्यावर उचलुन घेवुन कुपवाडमधील यल्लमा मंदीराशेजारील विहिरीत टाकण्याचा प्लॅन आखला. परंतु, मध्यरात्री कुत्र्यांच्या आवाजाने मृतदेह विहीरीत न टाकता ‘त्या’ पत्र्याच्या शेडमध्ये टाकून दोघेही पसार झाले.

11 जानेवारी रोजी सकाळी मृतदेह सापडला. मृताची ओळख पटल्याने खुन उघडकीस आला. याप्रकरणी मुलीने पोलिसांत संशयीत संतोष गवस विरोधात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि शोध घेण्यास सुरुवात केली. पसार झालेले संतोष गवस व उमेश कुल्लोळी हे दोघे सातारा जिह्यातील उरमोडी धरणाजवळ थांबल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पो.निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख प्रविण यादव, नितीन मोरे व विश्वास वाघ यांच्या पथकाने सापळा लावुन दोघांना साताऱयात पकडले. त्य़ांना अटक करण्यात आली. गुरुवारी दोघांना मिरज न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पो.निरीक्षक अशोक कदम करीत आहेत.

 डीबी पथकाच्या बक्षिसासाठी वरिष्ठांकडे मागणी करणार-धीरज पाटील

 कुपवाड परिसरांत गेल्या आठवडय़ात इंदुबाई माने व तुकाराम गुजले या दोन खुनाच्या घटना घडल्याने खळबळ उडाली. या दोन्ही खुन प्रकरणातील संशयीत आरोपी पसार झाल्य़ाने त्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. तरीही डीबी पथकाचे प्रमुख प्रविण यादव, नितीन मोरे व त्यांच्या पथकाने अथक प्रयत्नाने सर्व गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळवले. त्यामुळे पथकाच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या बक्षिसासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असल्याचे मिरजेचे उपाधिक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.

Related posts: