|Sunday, August 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकिस्तानचे बरळणे सुरूच

पाकिस्तानचे बरळणे सुरूच 

इस्लामाबाद / वृत्तसंस्था :

पाकिस्तानी सिनेटचे अध्यक्ष रजा रब्बानी यांनी अमेरिका, इस्रायल आणि भारतादरम्यान वृद्धिंगत होणारी आघाडी मुस्लीम जगतासाठी अत्यंत धोक्याचे असल्याचे म्हटले आहे. रब्बानी यांनी इस्लामिक देशांच्या संसदीय महासंघाच्या 13 व्या सत्राला संबोधित करताना हे विधान केले आहे.

जगाच्या देशांमधील नातेसंबंध बदल आहेत. अमेरिका, इस्रायल आणि भारतादरम्यान निर्माण होणाऱया आघाडीमुळे मुस्लीम जगताला धोका आहे. याला सामोरे जाण्यासाठी मुस्लीम जगताला एकत्र येण्याची गरज आहे. आज पाकिस्तान आणि इराण आहे, तर उद्या आणखीन कोणता देश यांचे लक्ष्य ठरू शकतो, असा दावा रब्बानी यांनी केला. अमेरिकेने अलिकडेच पाकिस्तानला दिली जाणारी सैन्यमदत रोखली होती. तर इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांना अमेरिकेने पाठिंबा दर्शविला होता.

जेरूसलेमच्या ऐतिहासिक स्थितीला बदलण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना पाकिस्तान तीव्रपणे विरोध करतो. अमेरिकेचा हा प्रयत्न आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचे उघड उल्लंघन असल्याचे रब्बानी म्हणाले. पश्चिम आशियातील शांतता प्रक्रिया धोक्यात आणण्याच्या प्रयत्नांची आम्ही निंदा करतो. अशा प्रयत्नांमुळे कायद्याचे उल्लंघन होण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय राजनयाच्या मापदंडांचा अनादर देखील होतो असा दावा त्यांनी केला.

पाकिस्तान स्वतःच दहशतवादाचा बळी ठरत आला आहे. दहशतवादाच्या खात्म्यासाठी पाकिस्तान स्वतःची सक्रीय भूमिका कायम बजावत राहिल असे रब्बानी यांनी दहशतवादाच्या मुद्यावर बोलताना सांगितले. पाकिस्तान दहशतवादाचे नंदनवन ठरल्याचा आरोप अनेक देश करू लागले आहेत. यात अमेरिका, ब्रिटन, इस्रायल, भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश यांचा प्रामुख्याने समावेश आहे.