|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कचरा, भंगाराचा पुनर्वापर

कचरा, भंगाराचा पुनर्वापर 

प्रतिनिधी  /पणजी :

विविध प्रकारचे धातू, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने अशा अनेक क्षेत्रातील तयार होणाऱया कचऱयाचा भंगाराचा पुनर्वापर करणाऱया उद्योगांना प्रोत्साहन, संरक्षण व सर्व ते सहकार्य देण्याची गरज मेटल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एमआर एआय) आंतरराष्ट्रीय परिषदेतून व्यक्त करण्यात आली.

त्यामुळे कचरा भंगार याचा जास्तीत जास्त वापर होऊन उद्योग वाढतील, नोकऱया मिळतील, पर्यावरण जतन होईल म्हणून त्यासाठी पुनर्वापर धोरण अंमलात आणावे आणि ‘रोड मॅप’ तयार करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. बांबोळी येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.‘भारतीय पुनर्वापर उद्योग’ हा या आंतरराष्ट्रीय परिषदेचा प्रमुख विषय असून त्याच्याशी संलग्न असलेल्या विविध मुद्यांवर सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. त्यात पुनर्वापर उद्योग वाढीवर चर्चा करण्यात येणार आहे.

केंद्रीय लोह, पोलद मंत्री चौधरी बिरेंद्रसिंग, केंद्रीय खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, निती आयोग सदस्य डॉ. व्हि.के. सारस्वत अशी मान्यवर मंडळी परिषदेच्या उद्घाटनाला व्यासपीठावर उपस्थित होती. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांचे नाव मान्यवरांमध्ये समाविष्ट होते. परंतु काही कारणांमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सदर परिषदेचे निमंत्रण देण्यात आले होते. तथापि त्यांनाही येणे जमले नाही. त्या दोघांनी परिषदेसाठी पाठविलेले संदेश वाचून दाखवण्यात आले. तिन्ही मंत्री तसेच डॉ. सारस्वत यांची भाषणे झाली. पुनर्वापर उद्योग वाढीवर त्यांनी भर दिला. परदेशात कचरा भंगार यांचा सुमारे 80 टक्के पुनर्वापर होतो. परंतु आपल्या भारत देशात ती टक्केवारी केवळ 20 एवढीच आहे. अशी माहिती त्यावेळी देण्यात आली.

विविध क्षेत्रातील कचरा-भंगार वाढत असून ते कमी करायचे झाल्यास पुनर्वापर उद्योग वाढीस लावणे हाच त्यावर उपाय असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. त्यामुळे पर्यावरण वाचेल. कचरा-भंगार याची निर्मिती कमी होईल आणि त्यांची जास्तीत जास्त विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणायची गरज असून तो कचरा गोळा करणे ही देखील मोठी समस्या आहे. ती देखील सोडवण्याची आवश्यकतेवर भर देण्यात आला. जीएसटीचा विषय त्यालाही लागत असल्याने त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले. असोशिएशनचे अध्यक्ष संजय मेहता यांनी स्वागत केले. सुमारे 1000 पेक्षा जास्त प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले आहेत.

Related posts: