|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोतील जनतेमध्ये पुन्हा निर्माण असुरक्षीततेची भावना

वास्कोतील जनतेमध्ये पुन्हा निर्माण असुरक्षीततेची भावना 

प्रतिनिधी/ वास्को

शुक्रवारी पहाटे झालेल्या अमोनिया गळतीमुळे स्थानिकांमध्ये पुन्हा एकदा असुरक्षीततेची भावना निर्माण झालेली असून रस्त्यांवरील अपघातात धोकादायक वायू गंभीर धोका निर्माण करू शकतो याची प्रचिती नागरिकांना आलेली आहे. या वायू गळतीमुळे वास्कोतील रस्त्यांवरून होणाऱया अमोनिया, ऍसिड आणि इंधनाच्या वाहतुकीवर कडक नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

वास्को शहर व परीसरातील रस्ते दिवसा गजबजलेले असतात. नवीन चौपदरी रस्ता पूर्ण होण्यासाठी अजून वर्ष लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोकादायक पदार्थांची वाहतुक जुन्या रस्त्यावरून आणि शहरातूनच होत असते. गजबजलेल्या वाहतुकीतूनच या इंधन, ऍसिड आणि अमोनियासारखे द्रव्य वाहणाऱया टँकरनाही वाट काढावी लागत असते. दिवसा व रात्री ही अवजड वाहने धावत असतात. त्यामुळे या अवजड वाहनांना अपघातांचाही धोका असतो. आतापर्यंत अशा टँकरना किरकोळ अपघात होत आलेले आहेत. शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघाताने मात्र गंभीर धोका निर्माण केला. परीसरातील लोकांना पहाटेच्या वेळी सुरक्षेसाठी घराबाहेर पडावे लागले. मात्र, झुआरी कंपनी आणि अग्नीशामक दलाच्या तत्परतेमुळे पुढील चार पाच तासात वातावरण पूर्वपदावर आले. या घटनेने शुक्रवारी त्या परीसरातील कुटुंबांच्या दैनंदिन व्यवहारात व्यत्यय आला. परीसरातील पाच शाळांतील मुलांना शाळेतील वर्गांपासून वंचीत व्हावे लागले. शुक्रवारचा अर्धा दिवस या परीसरात अस्वस्थता होती.

अमोनियावाहू टँकरला अपघात होऊन वायू गळती झाल्याने व लोकांना घर सोडून पळावे लागल्याने अशा अपघातात अशी मोठी घटनाही घडू शकते याचा प्रत्यय आलेला आहे. त्यामुळे असुरक्षीततेची भावना पुन्हा निर्माण झालेली आहे. साधारण महिनाभरापूर्वीच भारतीय नौदलाचे विमान अपघातात सापडून या विमानाने पेट घेण्याची घटना दाबोळीच्या लोकवस्तीच्या बाजुने घडली होती. तेव्हाही या लोकांनी भिती व्यक्त केली होती. अमोनिया गळतीमुळे अपघातांच्या भितीत आणखी भर पडलेली आहे. चिखलीतील विमानतळ मार्गावर ज्या ठिकाणी अमोनियावाहू टँकर कोसळला त्या ठिकाणपासून अवघ्या दोनशे तीनशे मिटर अंतरावर शाळां आहेत. या प्रत्येक शाळांमधून हजारो मुले शिकत असतात. अमोनिया गळतीची घटना रात्री ऐवजी दिवसा घडली असती तर या मुलांवर गंभीर प्रसंग ओढवला असता. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बचाव कार्यात कितपत यशस्वी ठरली असती हा प्रश्नच आहे. वास्कोतील रस्त्यांवरून अमोनिया, ऍसिड, तसेच इंधनाचे टँकर सतत धावत असतात. या टँकरना रस्त्यांवर अपघात होऊ शकतात. गंभीर अपघात झाल्यास जीवीत हानीचा गंभीर धोका असतो. त्यामुळे अशा वाहतुकीवर आता कडक नियंत्रण ठेवावे लागणार आहे. या वाहतुकीच्या अधिक सुरक्षेचाही विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

सुरक्षेचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार-आमदार कार्लुस आल्मेदा

वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी अमोनिया गळतीच्या घटनेबाबत चिंता व्यक्त करून आश्चर्यही व्यक्त केलेले आहे. धोकादायक वायुची वाहतुक करताना जनतेच्या सुरक्षेचा विचार करायलाच हवा. अमोनियावाहू टँकर केवळ रस्त्यावर कलंडला होता. त्याला मोठय़ा प्रमाणात गळती होईल ऐवढी ठेच कशी लागली याची चौकशी व्हायला हवी. अमोनिया वायू वाहतुकीसाठी हे टँकर विशेष तंज्ञत्रान वापरूनच रस्त्यावर आणले जातात. त्यामुळे मोठी गळती होऊ शकत नाही. परंतु अपघातात सापडलेला टँकर दर्जाहीन असावा किंवा त्याची योग्य तपासणी झालेली नसावी अशी शंका आमदारांनी व्यक्त केली. सुरक्षेचा हा प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेच्या वेळी आपत्ती व्यवस्थापन समिती पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. बचाव कार्यात कुणामध्येच सन्मवय नव्हता. आपत्ती व्यवस्थापनासंबंधी जिल्हाधिकाऱयांनी त्वरीत बैठक बोलावून आढावा घ्यायला हवा असे ते म्हणाले.

मुरगावच्या नगराध्यक्षांनाही व्यक्त केली चिंता

मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी अमोनिया गळतीच्या घटनेमुळे चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी वास्को शहरात अशा वाहतुकीवर बंदी घालण्याचा विचार चालवलेला आहे. जेटीवरील अमोनिया टाकीच्या स्थलांतराचीही मागणी त्यांनी केली. सुरक्षेच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पालिका मंडळाची बैठक घेण्यात येईल असे ते म्हणाले.