|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » युवा पिढी ही देशाची ताकद : भट्टाचार्य

युवा पिढी ही देशाची ताकद : भट्टाचार्य 

प्रतिनिधी / काणकोण

स्थानिक संस्कृतीचे संवर्धन करतानाच आपल्याजवळ ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचे प्रदर्शन सकारात्मक भावनेतून करायला हवे, असे मत ‘बांगला नाटक डॉट कॉम’चे संस्थापक अमिताभ भट्टाचार्य यांनी शनिवारी माशे-काणकोण येथे 23 व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना व्यक्त केले. युवा पिढी ही देशाची ताकद आहे. कला, कलाकार आणि ग्रामीण संस्कृती या त्रिसूत्रीच्या आधारे संस्कृती संवर्धनाचे काम करताना एकतेचा संदेश द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या समारंभाच्या व्यासपीठावर महोत्सवाचे स्वागताध्यक्ष प्रशांत नाईक, कार्याध्यक्ष समरेश वायंगणकर, प्रमुख संयोजक शैलेंद्र वेर्णेकर, कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष चेतन आचार्य, ओंकार संस्थेचे अध्यक्ष राजेश पागी, आविष्कार संस्थेचे अध्यक्ष सज्जन ना. गावकर उपस्थित होते.

प्रशांत नाईक यांनी आपल्या भाषणात कलेच्या माध्यमातून नोकऱया मिळविणे शक्य असल्याचे नजरेस आणून दिले. यावेळी चेतन आचार्य, समरेश वायंगणकर, शैलेंद्र वेर्णेकर यांची भाषणे झाली. या कार्यक्रमात कोकणी स्मरणिकेचे प्रकाशन भट्टाचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. या युवा महोत्सवाच्या स्थळाला ज्येष्ठ समाजसेवक स्व. ऍड. अमृत कांसार यांचे नाव, तर अन्य दालनांना बाबय वेरेकर, सुदेश प्रभुदेसाई, ऍड. सतीश सोनक, मिलिंद म्हाळशी, दत्ता पागी यांची नावे देण्यात आली आहेत.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पावशे यांनी केले, तर राजेश पागी यांनी आभार मानले. मोखर्ड येथील विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनी स्वागत नृत्य सादर केले.  त्यानंतर विविध स्पर्धात्मक कार्यक्रम झाले. आज महोत्सवाचा समारोप होणार असून संध्याकाळी लोलयेचे सरपंच अजय लोलयेकर यांच्या हस्ते विजेत्या पथकांना व स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या महोत्सवात गोव्याच्या विविध भागांतील उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि अन्य संस्था मिळून 32 पथके सहभागी झालेली आहेत