|Monday, May 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » गणेश जन्मला गं सखे…गणेश जन्मला…

गणेश जन्मला गं सखे…गणेश जन्मला… 

 

 

 पुणे / प्रतिनिधी :

माघ चतुर्थीला पाळणा हलला…; शिव-पार्वतीच्या घरी गणेश जन्मला गं सखे…गणेश जन्मला…या पाळण्यातून 251 महिलांनी गणेशजन्म सोहळय़ात विघ्नहर्त्या गजाननाचा जयघोष केला. ओम् गं गणपतये नमःच्या मंगल स्वरांनी दुपारी ठीक 12 वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत दगडूशेठ गणपती मंदिरात रविवारी मोठय़ात थाटात गणेश जन्माचा हा सोहळा पार पडला. मंदिरावर केलेली आकर्षक पुष्परचना आणि गाभाऱयात केलेली सजावट डोळय़ात साठवत गणेशभक्तांनी बाप्पाचरणी उत्तम आरोग्य आणि सुख-शांतीकरिता प्रार्थना केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. शुभांगी भालेराव यांनी गणेशजन्म सोहळय़ाचे पौरोहित्य केले. अभिजीत बहिरट यांनी सपत्निक पूजा केली. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, प्रकाश चव्हाण, शारदा गोडसे, संगीता रासने, ज्योती सूर्यवंशी, मृणालिनी रासने यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. भक्तांनी 551 किलोचा मोदक बाप्पाचरणी अर्पण केला. गणेशजन्म सोहळय़ानंतर सव्वा लाख तिळाच्या लाडूचे प्रसाद वाटप मंदिरामध्ये करण्यात आले.

पहाटे 4 वाजता सुप्रसिद्ध गायिका विभावरी आपटे-जोशी यांनी श्रींचरणी स्वराभिषेक अर्पण केला. शास्त्रीय गायनासह भक्तीगीते ऐकण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. त्यानंतर सकाळी 8 वाजता गणेशभक्तांच्या हस्ते गणेश याग पार पडला. यामध्ये अनेकांनी सहकुटुंब सहभाग घेतला. दुपारी गणेशाची मंगलआरतीदेखील करण्यात आली.

पुण्यासह देशभरातल गणेशभक्तांची गर्दी

सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखीतून वाजतगाजत नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बँड आदी सहभागी झाले. दगडूशेठ गणपती मंदिरापासून लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर. टिळक पुतळा मंडई, बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. मंदिराला फुलांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. पुण्यासह देशभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या गणेशभक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली.

Related posts: