|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीला बनणार ‘मँगो पर्यटन सिटी’

रत्नागिरीला बनणार ‘मँगो पर्यटन सिटी’ 

नगराध्यक्ष राहुल पंडित यांची माहिती

‘रत्नागिरी मँगो सिटी पर्यटन भरारी’ समूह स्थापन

विकएन्डला मिळणार विविध पर्यटन सुविधा

प्रतिनिधी /रत्नागिरी

नागपूरला ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळखले जात असून तशीच वैशिष्टयपूर्ण ओळख रत्नागिरीलाही मिळणार आहे. रत्नागिरी शहर व परिसराला पर्यटनाच्या जागतिन नकाशावर आणण्यासाठी पर्यटन क्षेत्रात कार्यरत मंडळी ‘रत्नागिरी मँगो सिटी पर्यटन भरारी’ या नावाने एका झेंडय़ाखाली आली आहेत. त्यांच्या माध्यमातून वर्षभर येणाऱया पर्यटकांना पर्यटनाच्या विविध संधी उपलब्ध करून देत रत्नागिरीला ‘मँगो पर्यटन सिटी’चा दर्जा मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरीत पर्यटकांचा मुक्काम वाढावा यासाठी शहर परिसरात पर्यटकांसाठी विकएन्डला विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गतवर्षी नगर परिषदेच्या माध्यमातून पर्यटन महोत्सव साजरा करण्यात आला त्यामुळे पर्यटनवाढीला वेग आला. आजही प्रसिद्धीपासून दूर असलेली पर्यटनस्थळे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पंडित यांनी सांगितले.

नाताळ आणि वर्षाअखेरीस सुट्टय़ांमध्ये कोकणात मोठय़ा संख्येने पर्यटक आले. या पर्यटकांना शहर आणि गणपतीपुळे येथे विविध पर्यटन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भाटय़े समुद्र किनारी व्हॅली क्रॉसिंग, तर रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेमध्ये सफारीचा थरार आणि रॅपलिंग या साऱयांचा अनुभव पर्यटकांना घेता आला. ‘जिद्दी माऊंटेनिअरिंग, अणि रत्नदुर्ग माऊंटेनियर्स यांनी ही जबाबदारी पार पाडली. थिबा पॅलेस वरून दिसणाऱया बेटाच्या सफारीसह हातीसपर्यंत बॅक वॉटर ची सफार घडविण्यासाठी डॉल्फीन बोट क्लब यांच्यासह सुशेगाद जलविहार सज्ज झाला आहे. तर हर्षा स्कुबा मिऱयाच्या समुद्र किनारी पाण्याखालील रंगीत दुनिया दाखवणार आहे. याच उपक्रमांमुळे गणपतीपुळे परिसरात प्राचीन कोकण हे अनोखे म्युझियम आणि मॅजिक गार्डनचे दर्शन घेता येणार आहे. मालुगंडच्या समुद्र किनारी विंग्ज ऍण्ड फ्लाईट पर्यटकांना पॅरामोटारींग च्या माध्यमातून आकाशातून कोकणच दर्शन घडवलं आहे.

रत्नागिरी मँगो पर्यटन सिटी भरारीतील या सगळय़ा उपक्रमांचा लाभ पर्यटकांबरोबरच स्थानिक रत्नागिरीकरांनीही घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केले आहे. ही पर्यटन भरारी राज्यभरातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सोशल मिडीया माहिती पत्रकाचा शुभारंभ सोमवारी नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी सुहास ठाकूरदेसाई, सचिन देसाई, धीरज पाटकर, राजा घाडीगावकर, प्रशांत परब, भाई रिसबूड, वीरेंद्र वणजू, गणेश चौगुले, पॅरामोटारींगचे एरीक, वैभव सरदेसाई आदी उपस्थित होते.

एप्रिलमध्ये न.प.तर्फे ‘पर्यटन महोत्सव’

रत्नागिरी नगर परिषदेने गतवर्षी प्रथमच येथील पर्यटनाला चालना देण्यासाटी ‘पर्यटन महोत्सव’ भरवला होता. त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावर्षीही एप्रिल महिन्यात न.प.तर्फे पर्यटन महोत्सव भरवण्यात येणार असल्याचे पंडित यांनी सांगितले.