|Saturday, October 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भूमीसी पाडिल दैत्य

भूमीसी पाडिल दैत्य 

नामदेराय वर्णन करतात-तृणावर्ताने उडवलेल्या वावटळीमुळे यशोदेला कृष्ण न दिसल्याने ती उर बडवून शोक करू लागली. तिचा अनिवार शोक पाहून तेथे गवळणी जमा झाल्या आणि आपापसात विचारू लागल्या-हे मैत्रिणींनो, कृष्णाला कोणी नेले? शोकमग्न यशोदा म्हणाली-मला घरादाराची जरूरी नाही, माझा संसार संपला. माझा तान्हाबाळ श्रीधर मला दाखवा, असे होणार हे जर मला माहीत असते, तर मी त्याला पोटाशी बांधून ठेवले असते. हे कृष्णा! तू कोठे अडकून बसला आहेस? हे धावणाऱया गौळणींनो धावत जा आणि माझ्या कृष्णाला शोधा. असा ती अनिवार शोक करू लागली. गौळणी म्हणाल्या-शिणल्या भागल्या वेळी, शीण दूर करण्यासाठी आम्ही तुझ्या घरी येत असू. हे उदार कृष्णा, तू तुझे मुख आम्हाला दाखव. यशोदा हंबरडा फोडून रडत होती. कृष्णवियोगाने तिचे प्राण जात आहेत की काय, असे वाटले.

श्रीमद्भागवतात वर्णन आले आहे की पुत्राच्या आठवणीने यशोदा अत्यंत व्याकूळ झाली आणि वासरू मेल्यावर गाईची जी अवस्था होते, तशी तिची दशा झाली व ती जमिनीवर कोसळली.

इकडे तृणावर्त वावटळीच्या रूपाने जेव्हा श्रीकृष्णाला उचलून आकाशात घेऊन गेला, तेव्हा त्याचे प्रचंड वजन त्याला सहन न झाल्याने त्याचा वेग शांत झाला, तो अधिक पळू शकला नाही. स्वतःपेक्षाही जास्त वजनदार असल्याने तृणावर्त श्रीकृष्णाला शिलाखंड समजू लागला. कृष्णाने त्याचा गळा असा पकडला की, तो त्या अद्भुत बालकाला आपल्यापासून बाजूला करू शकला नाही. श्रीकृष्णाने इतक्मया जोरात त्याचा गळा पकडला की, तो दैत्य निश्चेष्ट झाला. त्याची बुबुळे बाहेर आली, बोलणे बंद झाले व प्राण निघून गेले. अखेर त्या बालकासह तो जमिनीवर कोसळला.

तेथे ज्या गौळणी रडत होत्या, त्यांनी पाहिले की, एक अक्राळ विक्राळ राक्षस आकाशातून एका मोठय़ा शिळेवर येऊन आपटला आणि त्याचे सर्व अवयव मोडून पडले. जणू श्रीशंकरांच्या बाणांनी घायाळ होऊन पडलेला त्रिपुरासुरच!

बाळकृष्ण त्या प्रेत होऊन पडलेल्या तृणावर्ताच्या वक्षस्थळांवर लोंबकळत होता, हे पाहून नंदादी गोप गोपींना विस्मय वाटला. लगबगीने तेथे जाऊन त्यांनी कान्हय़ाला उचलून यशोदामाईकडे आणून दिले. मृत्युमुखातून बालक सुखरूपपणे परत आले. जरी राक्षस त्याला आकाशात घेऊन गेला होता, तरीसुद्धा तो मृत्यूच्या तोंडून सुटून सुखरूप परत आला, हे पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला.

ते म्हणू लागले-अहो! हे केवढे आश्चर्य! किती अद्भुत घटना घडली ते पहा ना! या मुलाला राक्षसाने मृत्यूच्या मुखात टाकले होते, परंतु हा परत आला. त्या हिंसाचारी दुष्टाला त्याच्या त्याच्या पापानेच गिळून टाकले. आम्ही असे कोणते तप, यज्ञ, दान इत्यादि केले होते की ज्यामुळे हा बालक मृत्यूच्या तावडीतून सुटून आपल्या स्वजनांना सुखी करण्यासाठी पुन्हा परत आला? काय आमचे भाग्य!