|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » यंत्रमाग कामगारांना सहा पैसे मजुरीवाढीची घोषणा

यंत्रमाग कामगारांना सहा पैसे मजुरीवाढीची घोषणा 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

येथील यंत्रमाग कामगारांना 52 पिकास मिटरवर आधारीत 6 पैसे मजुरीवाढीची घोषणा करण्यात आली आहे. अपर कामगार आयुक्त पुणे विभागचे आयुक्त बी. व्ही. वाघ यांनी या घोषणेचे पत्र सोमवारी दिले आहे. यामुळे शहरातील यंत्रमाग कामगारांना दिलासा मिळाला आहे.

इचलकरंजी येथे यंत्रमाग कामगारांना 2013 च्या सामंजस्य करारानुसार मागील दोन वर्षाच्या फरकासह मजुरीवाढ मिळावी यासाठी कामगार संघटनांच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. यामध्ये कामबंद, संप व मोर्चा यासारखी आंदोलने करण्यात आली होती. याबाबत इचलकरंजीचे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सर्व यंत्रमाग संघटनांनी किमान 6 पैसे मजुरीवाढ मान्य केली होती.  अखेर पुणे येथील अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग यांच्यावतीने एका पत्राद्वारे 2017 सालच्या महागाई भत्त्याची वाढ पिस रेटमध्ये रूपांतरीत करून 1 जानेवारी 2017 ची तीन पैसे मजुरीवाढ व 1 जानेवारी 2018 ची तीन पैसे मजुरीवाढीची घोषणा केली आहे. हे आदेश तत्काळ अंमलात येणार असून सर्व यंत्रमागधारक, मालक तसेच यंत्रमाग धारक मालक संघटनांनी मजुरीवाढीची त्वरीत अंमलबजावणी करावी व औद्योगिक शांतता व सुव्यवस्था कायम राखावी असे अपर कामगार आयुक्त बी. व्ही. वाघ व इचलकरंजीचे सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

मजुरीवाढ अमान्य- विनय महाजन, अध्यक्ष जागृती यंत्रमागधारक संघटना

सहाय्यक कामगार आयुक्तांनी आज यंत्रमाग कामगार मजुरीवाढीची घोषणा केली आहे. ती यंत्रमागधारक संघटनांना मान्य नाही. कारण कापड उत्पादन होवून विक्री झाले त्याचे पैसे आले त्यावरील मजुरी आत्ता कशी देणार आणि सध्या मंदी असल्यामुळे आम्ही कांहीही वाढ देवू शकत नाही. ही वाढ फक्त इचलकरंजीमध्येच का ? इतर टेक्साटइल सेंटरला का नाही.

चौकट करणे-

 मजुरीवाढीबाबत मार्गदर्शन करावे- सतीश कोष्टी, अध्यक्ष पॉवरलुम असोसिएशन

सहाय्यक कामगार आयुक्तांनी सुधारीत मजुरीवाढीची घोषणा केली आहे. यामध्ये 2017 सालची महागाई भत्त्याची वाढ पिस रेटवर रुपांतरीत करून 3 पैसे मजुरीवाढ जाहीर केली आहे. त्यावेळी उत्पादित झालेले कापड उत्पादित होवून विक्री झाले. त्यावेळच्या सुताचे दर, कामागारांचे दरावर व अन्य खर्च गृहीत धरला होता. त्याची मजुरीवाढ आता द्यायची कशी यावर आता यंत्रमागधारक विशेष करून खर्चीवाल्यांना मार्गदर्शन करावे.

मजुरीवाढीची घोषणा एकतर्फी – धर्मराज जाधव, अध्यक्ष, जनसेवा यंत्रमागधारक संघटना

सर्व यंत्रमागधारक संघटनांच्या वतीने सध्याची परिस्थिती पाहता यंत्रमागधारक मजुरीवाढ देवू शकत नाही त्यामुळे मजुरीवाढीची घोषणा करू नये अशी मागणी केली होती. पण सहाय्यक कामगार आयुक्तांनी ही एकतर्फी घोषणा करुन यंत्रमागधारकांवर अन्याय केला आहे. याचा मोठा परिणाम खर्चीवाल्या यंत्रमागधारकांवर होणार आहे.