|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तोर्ल सिद्धीविनायक मंदिरात गणेश जयंती उत्साहात

तोर्ल सिद्धीविनायक मंदिरात गणेश जयंती उत्साहात 

वार्ताहर/ बोरी

धनसडो तोर्ल शिरोडा येथील श्री सिद्धीविनायक देवस्थानमध्ये गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला. समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भंडारी समाज गोवाचे अध्यक्ष अनिल होबळे, समाजसेवक निलेश गावकर, बोरी जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, शिरोडय़ाचे सरपंच अमित शिरोडकर, फोंडय़ाचे माजी नगरसेवक अशोक नाईक, बोरीच्या पंचसदस्य ज्योती नाईक, यशवंत खेडेकर, दयानंद नाईक, मंगलदास नाईक, देवस्थानचे अध्यक्ष सुभाष नाईक आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अनिल होबळे म्हणाले, भंडारी समाजाला अनुसूचित जाती जमातीमध्ये सामावून घेण्यासाठी दीर्घ काळ प्रतिक्षा करावी लागली. या समाजातील लोकांनी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.  निलेश गावकर म्हणाले, गणपती हे हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असून श्री गणेश जन्माची कथा मुलांना सांगितली पाहिजे. तरुण पिढीने कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वाने पुढे येणे गरजेचे आहे. चांगल्या शिक्षणाबरोबरच संस्कार महत्त्वाचे आहेत. मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार झाल्यास त्यांचे भवितव्य चांगले होईल असेही त्यांनी नमूद केले. गावातील प्रसिद्ध डॉ. विजेता नाईक व सौ. नाईक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अशोक नाईक, ज्योती नाईक, दीपक नाईक, यशवंत खेडेकर, अमित शिरोडकर व इतरांची भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक मोहनदास नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रानंद नाईक यांनी केले.