|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चंद्रकांतदादा पाटलांच्या घरासमोर आज निदर्शने

चंद्रकांतदादा पाटलांच्या घरासमोर आज निदर्शने 

वक्तव्याचे सीमाभागात तीव्र पडसाद, पुतळय़ाचे दहन

प्रतिनिधी / बेळगाव

सीमाभागाचे समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद सीमाभागात उमटले आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुतळय़ाचे दहन करून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच मंगळवारी सकाळी थेट कोल्हापूर गाठून त्यांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा निर्णय येथील युवा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

कोल्हापूर जिल्हय़ाचे पालकमंत्रीपद भूषविणारे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. असे असताना त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे. याचा निषेध नोंदवून आपल्या भावना प्रकट करण्यासाठी काही कार्यकर्ते मंगळवारी कोल्हापूर येथे जाऊन चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरासमोर निदर्शने करणार आहेत.

चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकाक येथे केलेले वक्तव्य सीमावासीयांच्या भावना दुखविणारे आहे. त्यांनी ‘कर्नाटकात जन्मावे’ अशा अर्थाचे गीत गाऊन आपले कन्नडप्रेम प्रकट केले आणि सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. या घटनेच्या निषेधार्थ टिळक चौक येथे कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चंद्रकांतदादा पाटील यांचा निषेध नोंदवून त्यांचा पुतळाही जाळण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन निषेध केला.

संतप्त प्रतिक्रिया

वक्तव्य कर्नाटकाची तळी उचलून धरणारे :

शहर म. ए. समितीचे उपाध्यक्ष टी. के. पाटील

चंद्रकांतदादा पाटील हे सीमाप्रश्नासाठी नियुक्त केलेले समन्वयक मंत्री आहेत. त्यांनी सीमाबांधवांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बेळगावात येऊन येथे चर्चा करण्याची गरज आहे. परंतु, त्याचा त्यांना विसर पडला आहे. तसेच त्यांनी गोकाक येथे एका कार्यक्रमात सहभागी होऊन केलेले वक्तव्य फक्त सीमावासीयांची चेष्टा करणारेच नाही तर कर्नाटकाची तळी उचलून धरणारे आहे. त्यामुळे ही बाब निषेधार्ह आहे.

सीमावासीयांची माफी मागावी

महापौर संज्योत बांदेकर

आम्हा सीमाबांधवांना महाराष्ट्रातील नेतेमंडळी आमचे मार्गदर्शक वाटतात. त्यांच्याकडून काही मार्गदर्शन लाभावे, ही अपेक्षा सीमावासीय व्यक्त करीत असतात. परंतु, चंद्रकांतदादा पाटील यांनी या भावनेलाच हरताळ फासला आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सीमावासीयांची जाहीर माफी मागणे आवश्यक आहे.

सीमावासीयांच्या जखमेवरील खपली काढण्याचे कृत्य

शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे

चंद्रकांतदादा पाटील यांच्या वक्तव्याने सीमाबांधवांची मने केवळ दुखावली नाहीत तर जखमेवरची खपली काढण्याचे कृत्य यामधून झाले आहे. त्यांच्या या कृतीचा फक्त निषेध करणे पुरेसे नाही तर प्रत्येक सीमाबांधवाने याचा जाब विचारायला हवा. अन्यायाने कर्नाटकात डांबल्या गेलेल्या सीमावासीयांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी पुन्हा अन्याय करण्याचीच कृती करण्यात येत आहे. ही बाब निषेधार्ह आहे.

सीमावासीयांचा अपेक्षाभंग

तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे

चंद्रकांतदादा यांना सीमावासीयांच्या प्रश्नाची चाड राहिली नाही का? असा प्रश्न त्यांच्या वक्तव्यामुळे उपस्थित झाला आहे. बेळगाव आणि कोल्हापूर हे दोन्ही शेजारचे जिल्हे परस्पर हितबंधाने बांधले गेले आहेत. असे असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे फार अपेक्षेने पहात होतो. परंतु, त्यांनी आम्हा सीमावासीयांचा अपेक्षाभंग केला आहे. याबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांना चांगलीच समज द्यावी किंबहुना त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेऊन अन्य जाणकार मंत्र्यांकडे ही धुरा सोपवावी, अशी मागणी त्यांनी केली.