|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पाळीव जनावरांना पायलागाची लागण

पाळीव जनावरांना पायलागाची लागण 

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

  कुडाळ तालुक्यातील कुडाळ, पावशी आणि माडय़ाचीवाडी परिसरातील दुभत्या पाळीव जनावरांना पायलाग रोगाची लागण झाली असून जिल्हय़ात प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने या साथीचा फैलाव जोरात सुरू झाला आहे. जिल्हय़ात अन्यत्र ही साथ वेगाने फैलावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 कुडाळ येथे झालेल्या कृषी महोत्सवादरम्यान या साथीचा फैलाव सुरू झाला होता. मात्र शासनाने प्रतिबंधात्मक कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे ही साथ वेगाने पसरू लागली आहे. धोकादायक गोष्ट म्हणजे ‘सिंधुसरस कृषी प्रदर्शन’  तेंडावर आले आहे. या प्रदर्शनात गुरेही आणली जातात. त्यामुळे अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून गुरांना या साथीची लागण होण्यापूर्वीच युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक लस टोचणी होणे अत्यंत आवश्यक आहे. ही साथ तीव्र वेगाने पसरणारी असल्यामुळे जिल्हाभर पसरण्यापूर्वीच तिला अटकाव करणे अत्यंत आवश्यक आहे.

 दरम्यान जिल्हय़ातील उपलब्ध लसीबाबत माहिती घेतली असता जिल्हय़ात पायलाग प्रतिबंधक लसच उपलब्ध नसल्याचे समजते. आणिबाणीच्या परिस्थितीत या साथीने वेग पकडला, तर अनेक जनावरांना या साथीची बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने सिंधुसरस प्रदर्शनापूर्वीच शेतकऱयांना ही लस उपलब्ध करून देऊन साथीचा प्रतिबंध करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.