|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » ‘पद्मावत’च्या निषेधार्थ पुण्यात वाहनांची तोडफोड

‘पद्मावत’च्या निषेधार्थ पुण्यात वाहनांची तोडफोड 

ऑनलाईन टीम /पुणे 

   दिग्दर्शक संजय लिला भन्साळी निर्मिती ‘पद्मावत’ चित्रपटास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर रजपूत करणी सेनेच्या सुमारे 20 ते 25 कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळूर महामार्गावर वडगाव पूल येथे मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास रास्ता रोको करीत वाहनांची तोडफोड केली.

   याप्रकरणी महेश लक्ष्मण भापकर (वय 30, रा.कल्याण, जि. ठाणे) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी करणी सेनेच्या संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून, 15 जणांना अटक केली आहे. महेश भापकर हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून, ते त्यांच्या आयशर गाडीत माल भरून साखरवाडी येथून कुर्ला-चेंबूर येथे डिलिवरी करणेकामी मंगळवारी रात्री हायवेवरून जात होते. त्यावेळी वडगाव पुलावर अचानक आलेल्या सुमारे 20 ते 25 लोकांनी ट्रकच्या समोर भगवे झेंडे हातात घेत गाडी थांबवली. तसेच गाडीच्या पुढील काचेवर काठीहल्ला करीत काच फोडली. याशिवाय गाडीच्या टायरमधील हवा सोडून त्यांच्या गाडीच्या मागील बाजूस थांबलेल्या सुमारे आठ ते दहा वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. यामुळे वाहतूक कोंडी झाली. या कार्यकर्त्यांनी हातातील झेंडे उंचावून ‘आम्ही पदमावत प्रदर्शित होऊ देणार नाही’ अशा घोषणा देऊन गोंधळ घातला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) बी. एल. खोडदे करीत आहेत.

चित्रपटगृहाबाहेर आंदोलन करणार

   अखिल राजस्थानी समाज संघ, पुणेचे अध्यक्ष ओमसिंग भाटी म्हणाले, पद्मावत चित्रपटाला विरोध म्हणून वडगाव धायरी परिसरात आंदोलन करणाऱया आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करीत त्यांना मारहाण केली आहे. कार्यकर्त्यांनी वाहनांच्या काचा फोडल्या, हवा सोडली. मात्र, कोणत्या व्यक्तीस मारहाण केली नाही अथवा लुटमारी केली नाही. तरी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. पदमावत चित्रपटाला आमचा विरोध कायम असून गुरुवारी पुण्यातील चित्रपटगृहांबाहेर हा चित्रपट दाखविण्यात येऊ नये, याकरिता निर्देशने करण्यात येणार आहेत.

Related posts: