|Friday, January 24, 2020
You are here: Home » leadingnews » सीमाभागातील मराठी माणसावर प्रेम नसणाऱ्यांचे राज्यच घालवले पाहिजे;संजय राऊत

सीमाभागातील मराठी माणसावर प्रेम नसणाऱ्यांचे राज्यच घालवले पाहिजे;संजय राऊत 

ऑनलाईन टीम / पिंपरी 

भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील कर्नाटकमध्ये जातात आणि कानडीचे गोडवे गातात. सीमाप्रश्नासाठी शिवसेनेने रक्त सांडले. बेळगावातील मराठी बांधव आजही लढा देत आहेत. मात्र, भाजपवाल्यांना मराठी माणसाचे, सीमाप्रश्नाचे काही घेणे-देणे नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार व पुणे विभागीय संपर्क नेते संजय राऊत यांनी भाजपावर बुधवारी तोफ डागली. मराठी माणसाविषयी प्रेम नसलेल्या राज्यकर्त्यांचे राज्यच आता घालविले पाहिजे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघनिहाय बैठका संजय राऊत यांच्या उपस्थितीत पार पडल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख योगेश बाबर, पालिकेतील गटनेते राहुल कलाटे, महिला संघटिका सुलभा उबाळे, संघटक गोविंद घोळवे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.

जन्मावे तर कर्नाटकात, अशा आशयाचे कानडी गीत सादर करीत राज्याचे महसूलमंत्री व सीमाभागाचे समन्वयमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या कर्नाटकी स्तुतीगानाचा राऊत यांनीही कठोर शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, सीमाप्रश्नासाठी शिवसेनेने रक्त सांडले. मात्र, आज सत्तेत असलेल्या लोकांना त्याचे काही घेणे देणे नाही. भाजपाचे मंत्री कर्नाटकात जाऊन कानडीचे गोडवे गातात, यातूनच काय ते लक्षात येते. मराठी माणसांविषयी प्रेम नसणारे हे राज्यकर्ते आहेत. म्हणूनच हे राज्य घालविणे गरजेचे आहे.  आगामी निवडणुकीचे रणशिंग आम्ही फुंकले आहे. सत्ताधारी पक्षच पहिला विरोधक असतो. त्यामुळे आमचा पहिला विरोधक भाजपाच राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Related posts: