|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कर्नाटकमधील बंदमुळे गोव्यात प्रवाशांचे हाल

कर्नाटकमधील बंदमुळे गोव्यात प्रवाशांचे हाल 

प्रतिनिधी /पणजी :

कर्नाटकात गुरुवारी म्हादई प्रश्नावरुन बंद पुकारण्यात आल्याने गोव्यातून तिकडे जाणाऱया प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांचे हाल झाले. कदंबच्या बसगाडय़ा कर्नाटकात गेल्या नाहीत. परिणामी अनेक प्रवासी गोव्यातच विविध ठिकाणी बसस्थानकात अडकून पडले. बंदमुळे कर्नाटकात जाणारे अनेक प्रवासी माघारी फिरले.

गोव्यातून बेळगांव, हुबळी, धारवाड या भागात कदंबच्या बसगाडय़ा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागली. बंदमुळे अनेक वाहने तसेच बसगाडय़ा कर्नाटकात गेल्या नाहीत. शुक्रवार सुट्टीचा दिवस असल्याने तसेच शनिवार, रविवार असल्याने कामानिमित्त गोव्यात असलेल्या कर्नाटकातील नागरिकांनी घरी जाण्याचा बेत ठरवला होता. परंतु बंदमुळे व प्रवासी गाडय़ा उपलब्ध नसल्याने तो फसला आणि त्यांना तो बदलावा लागला. काही प्रवाशांनी अगोदर आरक्षणही केले होते परंतु बसगाडीच उपलब्ध नसल्याने ते प्रवासी तिकडे जाऊ शकले नाहीत. दरम्यान, गोव्यातील काही खासगी वाहनांवर कर्नाटकात दगडफेक झाल्याचे वृत्त आहे.

कदंब महामंडळाने बुधवारपासून कर्नाटकातील बससेवा थांबवली असून बंगलोर – म्हैसूर येथे कदंबच्या दोन गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. त्यांना तिकडेच थांबण्याची सूचना करण्यात आली आहे. ‘बंद’चा धसका घेऊन अनेक गोमंतकीयांनी आपली खासगी वाहनांनी तिकडे न जाणेच पसंत केले.

Related posts: