|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रशांत वाडेकर यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर

प्रशांत वाडेकर यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर 

भाई खवळे चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर : प्रा. दप्तरदार, डॉ. आठवलेंसह सात जणांना पुरस्कार

वार्ताहर / देवगड:

येथील कै. परशुराम आबा उर्फ भाई खवळे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने यावर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱया व्यक्तींना पुरस्कार जाहीर करण्यात करण्यात आले आहेत. यात ‘तरुण भारत’चे देवगड तालुका प्रतिनिधी प्रशांत वाडेकर यांना पत्रकारिता पुरस्कार, प्रा. नागेश दप्तरदार यांना प्राणीमित्र पुरस्कार, किंजवडे येथील संगीत विशारद विश्वास प्रभूदेसाई यांना संगीतशास्त्र पुरस्कार, मंदाकिनी गोडसे यांना साहित्यिक पुरस्कार, डॉ. सुनील आठवले यांना प्राणरक्षक पुरस्कार, तांबळडेग येथील पांडुरंग पराडकर यांना समाजभूषण पुरस्कार तर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱया आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ-देवगड यांना विशेष पुरस्कार देण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तुकाराम खवळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कै. भाई खवळे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रथमच यावर्षीपासून विविध क्षेत्रात काम करणाऱया व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांच्या निवडीसाठी विविध क्षेत्रातील तज्ञांची समिती नेमण्यात आली होती. पत्रकारितेमध्ये गेली 17 वर्षे काम करून देवगड तालुक्यातील विविध विषयांवर केलेले सडेतोड लिखाण व सामाजिक क्षेत्रातील दिलेले योगदानामुळे ‘तरुण भारत’चे प्रतिनिधी श्री. वाडेकर यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाने गेली 15 वर्षे देवगड तालुक्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून देवगड तालुक्यात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केले, याबद्दल आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाला विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यात आरोग्य क्षेत्रात डॉ. आठवले यांचे मोठे योगदान असून आरोग्यविषयक अनेक उपक्रम व सुविधा त्यांनी देवगडवासियांना उपलब्ध करून दिल्या आहेत. किंजवडे येथील संगीत विशारद प्रभूदेसाई यांनी संगीत क्षेत्राला दिलेल्या योगदानाबाबत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देवगड महाविद्यालयातील प्रा. दप्तरदार यांनी वन्यप्राणी व पक्षी, समुद्री कासव संवर्धनात दिलेल्या विशेष योगदानाबाबत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रात प्रशंसनीय काम केलेल्या साहित्यिका श्रीमती गोडसे यांना साहित्यिक पुरस्कार, तर समाजासाठी झटत असलेल्या तांबळडेग येथील पराडकर यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, असे खवळे यांनी सांगितले.

शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ट्रस्टच्या सचिव तन्वी खवळे, उपाध्यक्ष दिनेश खवळे, सौ. पूर्वा तारी, विनय परब, सुमित कुबल, राजू निकम आदी उपस्थित होते.