|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पं. कैवल्यकुमार यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

पं. कैवल्यकुमार यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध 

प्रतिनिधी/ कराड

कराड जिमखाना आयोजित प्रीतिसंगम संगीत महोत्सवाचे ख्यातनाम शास्त्रीय गायक पै. कैवल्यकुमार यांच्या उद्घाटन झाले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पं. कैवल्यकुमार यांचे गायन झाले. सुरुवातीला त्यांनी मारुबिहाग रागातील विलंबित बंदिश सादर केली. त्यानंतर सखी बीन बजाये ही द्रुत बंदिश सादर केली. तसेच मुलतानी दादरा, शुदा मी बंदिले, हे नाटय़पद येथे कारे उमा रामा हा अभंग व भैरवीतील होरी गाऊन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. तिन्ही सप्तकात लीलया संचार, सुरेख मींडकाम, अष्टांग प्रधान गायकी ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्टय़े रसिकांनी अनुभवली.

महोत्सवाच्या दुसऱया दिवशीच्या पहिल्या सत्रात कराडच्या उदयोन्मुख गायिका आलापिनी जोशी यांनी पुरीया कल्याण व मधुकंस हे राग व दादरा, अभंग असे सादरीकरण केले. जोहार मायबाप या नाटय़गीताने एक वेगळीच उंची गाठली.

दुसऱया सत्रात युवा बासरीवादक एस. आकाश व व्हायोलीन वादक ज्ञानेश रायकर यांनी मालकंस रागात जुगलबंदी सादर करत रसिकांची मने जिंकली. हंसध्वनी या रागात झाला, तिहाई, विविध लयकारी दर्शवत कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू गाठला. एस. आकाश यांचे लयकारी अंग व यज्ञेश रायकर यांची गायकी अंग यांचा अनोखा प्रीतिसंगम कराडकरांनी अनुभवला. महोत्सवाची सांगता अवघा रंग एक झाला, भैरवीतील अभंग कु. मधुरा किरपेकर हिने व्हायोलीन व बासरीच्या साथीने सादर केला. संवादिनीवर सुरेश फडतरे, तबल्यावर हनुमंत फडतरे यांनी साथ संगत केली तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पखवाज वादक सुखद मुंडे यांच्या वादनाने कार्यक्रमाला आगळीच रंगत आणली.

प्रास्ताविक व कलाकारांचा सत्कार अध्यक्ष महेंद्रकुमार शाह यांनी केला. सूत्रसंचालन जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे यांनी केले. तर कलाकारांची ओळख शुभांगी हुद्दार, दिलीप आगाशे, मधुरा किरपेकर यांनी करून दिली. प्रमोद गरगटे यांनी आभार मानले. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने महोत्सवाची सांगता झाली.

 

 

 

Related posts: